maharashtra

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध गुटख्याविरोधात कारवाई

सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघेजण ताब्यात

Local Crime Branch squad cracks down on illegal gutkha
अवैधरित्या गुटखा वाहतूक प्रकरणी शेंद्रेजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सातारा : अवैधरित्या गुटखा वाहतूक प्रकरणी शेंद्रेजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटख्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे एक विशेष पथक तयार केलेले आहे.
दि. 28 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेंद्रे ता.जि.सातारा गावचे हददीत साताराकडे येणार्‍या सर्व्हीस रोड येथे दोन इसम त्यांच्या टेम्पोमधून महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला गुटखा कर्नाटक येथुन घेवून येणार आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील पथक तेथे सापळा लावून थांबले असताना दोन इसम त्यांच्या ताब्यातील टेम्पोमधून गुटख्याची पोती व बॉक्स घेवून आले व टेम्पोतील गुटख्याचे बॉक्स सातारा येथील विकत घेणार्‍या इसमाच्या कारमध्ये ठेवत असताना सापडले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने टेम्पोमधील दोन इसम व कारमधील एक इसम अशा तीन इसमांना दोन वाहनासह ताब्यात घेवून त्यांच्याकडून आर.एम.डी.पान मसाला, विमल पानमसाला व व्ही-1 टॉबेको (तंबाखू) वगैरे असा 8 लाख 92 हजार 800 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल व 2 वाहने असा एकुण 20 लाख 92 हजार 800 रुपयांचा माल (गुटखा) ताब्यात घेतला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, विकास सोनावणे यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होवुन ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजेंद्र विजय सोनावणे (वय 23, रा. सर्वोदय कॉलनी, गडकर आळी, सातारा), टिपू गुडलाल मुजावर (वय 23, रा. कुडची बिलाल मोहल्ला, ता. रेहबाग, जि. बेळगाव), ख्वाजासाब मिरासाब सनदी (वय 28, रा. समतानगर, अक्सा मशिदीजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली) अशी या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या सुचनांप्रमाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, पो.हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, पो.ना.निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, शिवाजी भिसे, मोहन पवार, विक्रम पिसाळ, पो.कॉ. रोहित निकम, स्वप्नील माने, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव यांनी केली आहे.