जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सोय
नागरिकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयाकडे होणाऱ्या तक्रारी जिल्हा स्तरावर देता याव्यात, यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु केला आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर आलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही केली जाईल.
सातारा : मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयाकडे होणाऱ्या तक्रारी जिल्हा स्तरावर देता याव्यात, यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु केला आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर आलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही केली जाईल. तक्रारदारांना जिल्ह्यात न्याय मिळावा, यासाठी हा कक्ष असून, त्याचा जास्तीत जास्त जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, नायब तहसीलदार प्रतिभा खाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जात आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालयाचे नोडल अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. या कक्षाला नायब तहसीलदार व कर्मचारी नेमले आहेत. नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींना युनिक कोड देण्यात येणार आहे. ही कार्यवाही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मंत्रालय स्तरावर अर्जाच्या प्रगतीबाबत लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी मंत्रालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यांचे प्रश्न जिल्ह्यातच सोडविले जातील. जे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, असे प्रश्न मंत्रलाय स्तरावर पाठविण्यात येणार आहेत. तसेच जे प्रश्न सोडविता येणार नाहीत, त्यांना कारणांसह लेखी कळविण्यात येणार आहे.


