maharashtra

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये माणचा बाळू पुकळे प्रथम : महिल गटात मुंबईची मनिषा जोशी प्रथम


Manacha Balu Pukle first in Satara Hill Half Marathon: Mumbai's Manisha Joshi first in women's group
स्पर्धेवर यावर्षी परदेशी धावपट्टू नसल्याने स्थानिक धावपट्टूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत खुल्या माणच्या बाळू पुकळे या धावपटूने 1 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. अनिल कोरवी याने 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद दुसरा तर धर्मेंदर कुमार याने 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद तिसरा क्रमांक पटकावला. तर भारतीय महिला गटात मुंबर्इच्या मनिषा जोशी यांनी 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद या वेळेत पहिला क्रमांक पटकावला.

सातारा : ढगाळ वातावरण... यवतेश्‍वर घाटातील धबधबे, हिरवाईने फुललेला निसर्ग आणि सकाळचे आल्हाददायी वातावरणात रविवार दि १२ रोजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धकांमुळे यवतेश्‍वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या, वाद्यांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्पर्धेवर यावर्षी परदेशी धावपट्टू नसल्याने स्थानिक धावपट्टूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत खुल्या माणच्या बाळू पुकळे या धावपटूने 1 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. अनिल कोरवी याने 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद दुसरा तर धर्मेंदर कुमार याने 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद तिसरा क्रमांक पटकावला. तर भारतीय महिला गटात मुंबर्इच्या मनिषा जोशी यांनी 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद या वेळेत पहिला क्रमांक पटकावला.
सातारा रनर्स फाउंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला पोलीस कवायत मैदानावरून सकाळी 6 वाजता उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. खासदार उदयनराजे भोसले, सातारा रनर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. साताऱ्याच्या या हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेचा गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. पुढील काळात विविध विक्रम प्रस्थापित करत सातारा हिल मॅरेथॉन साताऱ्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. अबालवृध्द स्पर्धकांच्या अमाप उत्साहात ही मॅरेथॉन स्पर्धा झाली. कोरोनाच्या संकटावर मात करण्याची प्रेरणाही या स्पर्धेने दिली.
 निसर्गाच्या सानिध्यात होणारी सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा परदेशी धावपट्टूंसाठी खास आकर्षण असते. मात्र, यावर्षी कोरोना साथीमुळे परदेशी धावपट्टूंना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला नव्हता. सहभागी झालेल्या सर्व धावपट्टूंनी लसीचे दोन डोस पूर्ण केलेत की नाहीत याची खात्री करुनच मग त्यांना धावण्यास परवानगी देण्यात आली होती. सध्या सातारा जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे सावट कमी होत असल्याने इतर जिल्ह्यातील धावपट्टूही सहभागी झाले होते. स्पर्धक संख्या कमी असल्याने यावर्षी कोणाचीही गैरसोय झाली नाही. स्पर्धक संख्या कमी झाल्याने त्यामुळे सातारा शहरातील हॉटेल व्यवसाय व लॉजिंग व्यवसायात होणारी मोठी आर्थिक उलाढल कमी झाली होती.
कोरोनामुळे स्पर्धक संख्या मर्यादित
पोवई नाका, कर्मवीर पथ मार्गे शेटे चौक, कमानी हौद, राजपथावरुन राजवाडा-समर्थ मंदिरमार्गे बोगदा-प्रकृती रिसॉर्ट. परत बोगदा, अदालतवाडामार्गे शाहू चौक, रविवार पेठ पोलीस चौकी, कर्मवीर पथावरून नाक्यावर धावपटू आल्यानंतर पोलीस मैदानावर स्पर्धेची सांगता झाली. 21 किलो मीटरच्या या स्पर्धेत हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी धावपटू शनिवारीच साताऱ्यात दाखल झाले होते. सकाळी 9 वाजता 'फन रन' सुरू झाली. या वेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत मोठ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. सुमारे 1 हजार 500 स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
सातारकरांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह
यावर्षी स्पर्धकांचा कमी संख्येने सहभाग असल्याने स्पर्धा लवकर उरकली. स्पर्धा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पहाटेपासून सातारकरांनी धावणाऱ्या स्पर्धकांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत त्यांचा उत्साह वाढवला. तरुण मंडळे, गणेश मंडळांनी देखील स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. धावणाऱ्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी फुटांफुटांवर कार्यकर्ते व पोलीस उभे होते. हलगी, तुतारीचा आवाज, समुह नृत्ये विशेष आकर्षण ठरले होते. पहाटेच्या थंडीत, ढगाळ वातावरणात आणि धुक्याची दुलर्इ पांघरलेल्या निसर्गरम्य साताऱ्यातील स्पर्धा नेहमीप्रमाणेच स्पर्धकांना आनंद देवून गेली. स्पर्धक कमी असल्याने यावर्षी आयोजकांवरील ताण कमी झाला होता.
कोरोनाचे नियम पाळून स्पर्धा यशस्वी
कोरोना साथीची तीव्रता कमी झाल्याने तसेच लसीकरण मोहीम देशभरात व खासकरून महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, गोवा यांसह देशभरात व जगभरातही अनेक मोठ्या शहरांमध्ये अलीकडच्या काळात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झाल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने यावर्षी "सातारा हिल हाफ मॅरेथॉन'चे संयोजन नेहमीपेक्षा खूप छोट्या प्रमाणावर व नियमांना अधीन राहून करण्यास परवानगी दिली होती. सातारा हिल मॅरेथॉन गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नाही. पण यावर्षी नेहमीपेक्षा केवळ पंचवीस टक्के स्पर्धकांना घेऊन व त्याबाबतचे सोशल डिस्टंसिंग राखणे, मास्क लावणे, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे, निर्जंतुकीकरण इत्यादी सर्व निकष पाळून यावर्षीची मॅरेथॉन यशस्वीपणे पडली. स्पर्धेत गर्दी कमी करण्यासाठी बक्षीस समारंभही टाळला गेला.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा सविस्तर निकाल
खुला गट : पहिला क्रमांक : बाळू पुकळे, वेळ : 1 तास 14 मिनिटे 13 सेकंद. बक्षीस रक्कम :  दीड लाख रुपये. दुसरा क्रमांक : अनिल कोरवी वेळ : 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद. बक्षीस रक्कम : एक लाख रुपये. तिसरा क्रमांक धर्मेंदर कुमार वेळ : 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद. बक्षीस रक्कम : 75,000 रुपये.
महिला गट : पहिला क्रमांक : मनिषा जोशी, मुंबर्इ, वेळ : 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद. बक्षीस रक्कम : दीड लाख रुपये. दुसरा क्रमांक : माधुरी बनसोडे वेळ 1 तास 47 मिनिटे 20 सेकंद. बक्षीस रक्कम : एक लाख रुपये. तिसरा क्रमांक वैशाली गर्ग 1 तास 50 मिनिटे 27 सेकंद. बक्षीस रक्कम : 75,000 रुपये.
30 ते 39 वयोगटात : प्रथम क्रमांक अनिल कोरवी, वेळ 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद, दुसरा क्रमांक धर्मेंदर कुमार वेळ 1 तास 21 मिनिटे 9 सेकंद व तिसरा क्रमांक मलिकार्जून परडे वेळ 1 तास 24 मिनिटे 13 सेकंद.
40 ते 49 वयोगटात : प्रथम क्रमांक सुनील शिवदे : 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद, दुसरा क्रमांक आरबीएस मोनी 1 तास 30 मिनिटे, 14 सेकंद व तिसरा क्रमांक जयंत शिवदे वेळ 1 तास 33 मिनिटे 14 सेकंद
50 ते 59 वयोगटात : प्रथम क्रमांक हरिष चंद्रा, 1 तास 33 मिनिटे 2 सेकंद, दुसरा क्रमांक पांडुरंग पाटील 1 तास 35 मिनिटे 15 सेकंद, तिसरा क्रमांक विठ्ठल अरगडे 1 तास 42 मिनिटे 38 सेकंद.
60 ते 69 वयोगटात : प्रथम क्रमांक पांडुरंग चौगुले वेळ 1 तास 35 मिनिटे 32 सेकंद, दुसरा क्रमांक महिपती संकपाळ वेळ 1 तास 41 मिनिटे 51 सेकंद, तिसरा क्रमांक अजित कुंभोज वेळ 1 तास 58 मिनिटे 55 सेकंद.
70 ते वरील वयोगटात : प्रथम क्रमांक भलाणी वेळ 2 तास 7 मिनिटे 22 सेकंद, दुसरा क्रमांक बाळासाहेब भोगम वेळ 2 तास 25 मिनिटे 26 सेकंद, तिसरा क्रमांक राजाराम पवार वेळ 2 तास 38 मिनिटे 59 सेकंद.