maharashtra

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन


थकित मानधन, शासकीय सेवेत समायोजन, बदली धोरण यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुरुष तसेच महिला आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सातारा : थकित मानधन, शासकीय सेवेत समायोजन, बदली धोरण यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुरुष तसेच महिला आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.
याबाबत संघटनेच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी की, आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनीयनच्या वतीने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. आताचे आंदोलन हे जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी, ग्रामीण तर एनयूएचएम अंतर्गत कार्यरत आणि एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथील करुन नियमीत रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घ्यावा. समान वेतन, समान काम यासह कंत्राटी कर्मचाऱ्याचे शासकीय सेवेत सरसकट समायोजन अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्यावतीनेही आंदोलन सुरू आहे. तर याही संघटनेने २५ ऑक्टोबरपासूनच काम बंद केलेले आहे.
या आंदोलनात दोन्ही संघटनांचे सुमारे ४०० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.