maharashtra

साताऱ्यात स्पीकर परवाना उल्लंघन, ध्वनी प्रदुषण प्रकरणी गणेश मंडळावर कारवाई

सदरबझारमधील मंडळाच्या अध्यक्षासह साऊंड सिस्टिम मालक व चालकावर खटला

साताऱ्यातील सदरबझार परिसरातील गणेश कॉलनीतील श्रीमंत युवा गणेश उत्सव मंडळाने गणेशमूर्ती मिरवणुकीत ओमनी कारवर साऊंड सिस्टिम बसवून आणि ती कर्णकर्कश आवाजात सुरु ठेवून शेजारील रहिवासांना त्रास होईल असे वर्तन केले.

सातारा : साताऱ्यातील सदरबझार परिसरातील गणेश कॉलनीतील श्रीमंत युवा गणेश उत्सव मंडळाने गणेशमूर्ती मिरवणुकीत ओमनी कारवर साऊंड सिस्टिम बसवून आणि ती कर्णकर्कश आवाजात सुरु ठेवून शेजारील रहिवासांना त्रास होईल असे वर्तन केले. तसेच स्पीकर परवाना न घेता वाद्य वाजवून ध्वनी प्रदुषण केल्याने या मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह साऊंड सिस्टिम मालक, चालक अशा पाचजणांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 21 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेश कॉलनी, सर्वटे हॉस्पीटल समोर, सदरबझार, सातारा या ठिकाणी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीकरीता ओमनी गाडीवर कर्णे, स्पिकर बसवुन कर्णकर्कश आवाजात जास्त वेळ सुरु ठेवण्यात आले होते. याबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी मिरवणुकीत जावून याबाबत चौकशी केली असता मंडळाने कोणताही स्पीकर परवाना घेतला नव्हता. तसेच विना परवानगी स्पीकर वाद्य वाजवून ध्वनी प्रदुषण केले असल्याचे निदर्शनास आले.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कांबळे व पोलीस हवालदार मेचकर यांनी या मंडळावर कारवाई केली. कारवाईत गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत भगवान मोहिते (वय 31, रा. गणेश कॉलनी, सदरबझार, सातारा) व उपाध्यक्ष चेतन मोहन लंबाते (वय 34, रा. गणेश कॉलनी, सदरबझार, सातारा) तसेच साऊंड सिस्टिम मालक अन्सार शेख (रा. शनिवार पेठ, सातारा), लाईट व जनरेटर सिस्टिम मालक रजनीकांत चंद्रकांत नागे (रा. रविवार पेठ, सातारा) आणि सिस्टिमचा चालक गणेश सुरेश जगदाळे (रा. ढोरगल्ली, मल्हारपेठ, सातारा) अशा पाचजणांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली आहे.