maharashtra

गुरुवार परज येथे पालिकेचे नवीन शॉपिंग सेंटर

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे दहा कोटी रुपये मंजूर

सातारा शहराच्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अस्तित्वात असणाऱ्या गुरुवार परज येथील जुन्या शॉपिंगसेंटरच्या बाजूला सुसज्य आणि अदयावत शॉपिंग सेंटर उभारणेचा नगरपरिषदेचा प्रस्तावास शासनाने वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन मंजूरी दिली आहे. त्याकरीता 10 कोटी रुपयांचा निधी देखिल प्राप्त झाला आहे.

सातारा : सातारा शहराच्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अस्तित्वात असणाऱ्या गुरुवार परज येथील जुन्या शॉपिंगसेंटरच्या बाजूला सुसज्य आणि अदयावत शॉपिंग सेंटर उभारणेचा नगरपरिषदेचा प्रस्तावास शासनाने वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन मंजूरी दिली आहे. त्याकरीता 10 कोटी रुपयांचा निधी देखिल प्राप्त झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या तीन मजली नवीन व्यापारी वास्तुमुळे, शहरातील व्यापार उदिमाला चालना मिळण्याबरोबरच सातारच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  
सातारा नगरपरिषदेच्या गुरुवार परज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोकळया जागेत पूर्वी मोठा बाजार भरत असे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय राजवटी दरम्यान याठिकाणी सुमारे 40 वर्षापूर्वी नगरपरिषदेने शॉपिंग सेंटर उभारलेले आहे. त्यावेळच्या धोरणानुसार उभारण्यात आलेल्या या वास्तुमधील गाळयांचा व्यापारी उपयोग होण्याबरोबरच नगरपरिषदेची शाळा भरत आहे. तसेच मुबलक मोकळी जागा शिल्लक आहे.
याठिकाणी जुन्या शॉपिंग सेटरच्या बाजुला अदयावत व परिपूर्ण आराखडा तयार करुन, नवीन शॉपिंग सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सातारा विकास आघाडीच्या सुचनेवरुन  नगरपरिषदेने नगरविकास विभागाला सादर केला होता. याबाबत मुख्य मंत्री तथा नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना आम्ही विनंती केली असता, त्यांनी  सकारात्मकतेने आणि संवेदनशीलतेने वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन प्रस्ताव मंजूर करताना, 10 कोटी रुपयांचा भरीव निधी देखिल मंजूर केला आहे.
या नवीन शॉपिंगसेंटरची उभारणी करताना, नगरपरिषदेच्या जागेचा पूरेपूर उपयोग सामान्य नागरीक, व्यापारी यांना होण्याकरीता विशेष लक्ष पुरवलेले आहे. तीन मजली इमारतीमध्ये व्यापारी गाळे, प्रशस्त पार्किंग, आणि ऑफिसेसकरीता जागा उपलब्ध होणार आहे.
सातारचा गुरुवार परज हा परिसर जास्त लोकसंख्या घनतेचा आणि नेहमीच वदर्ळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. याठिकाणी मोठी वास्तु सुविधांसह उभारणी झाल्यावर या परिसराचा अमुलाग्र बदल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, यांचा साताऱ्याबद्दलचा जिव्हाळा पुन्हा एकदा दिसून आला आहे. तसेच पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सातारा शहरात कोटयावधींची कामे प्रामुख्याने केंद्र व राज्यशासनाकडून निधी प्राप्त करुन होत आहेत. नगरपरिषदेवर फारसा आर्थिक ताण न येता नागरीकांना सर्व सुविधा देण्याचा व्यक्तीगत आमचा आणि सातारा विकास आघाडीचा प्रयत्न नेहमीच राहीला आहे. आमच्या प्रयत्नांचा लाभ सर्व सातारकर नागरीकांना होत आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे.