maharashtra

अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे मंत्रालयातील बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

Take action against illegal microfinance companies
अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मुंबई : अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.
कोल्हापूर जिह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने होणाऱ्या कर्जवसुलीबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र दराडे, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सनदशीर मार्गाने कर्जवसुली न करता ज्या कंपन्या कर्जदारांना अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलिसात तक्रार द्यावी. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून असभ्य भाषेचा वापर करणे, कर्जदारांना रस्त्यात अडविणे, घरात घुसणे अशा प्रकारचे वर्तन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या अवैध कर्ज वसुलीबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवैध कर्ज वसुलीबाबतच्या तक्रारींचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर करावा. हा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल. कंपन्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला वेळीच आळा घातला पाहिजे, असेही गृह राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

मॅग फिनसर्व्ह कडून ग्राहकाचे गहाण ठेवलेले दागिने गहाळ
पाटण येथील फत्तेसिंह पाटणकर यांनी मॅग फिनसर्व्ह कंपनीच्या पाटण शाखेत आर्थिक कारणास्तव सोन्याचे दागिने गहाण ठेवून २०१९ साली कर्ज घेतले होते. मुदतीनंतर बँकेने पाटणकर यांना ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी नोटीस दिली. त्या नोटीसीला अनुसरून पाटणकर दागिने सोडवण्यासाठी बँकेच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात सांगितलेली रककम व्याजासह घेऊन गेले. त्यावेळी कार्यालयात सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यावेळेस त्यांना मुख्य व्यवस्थापक विनायक सुळ यांनी वरिष्ठांबरोबर सल्लामसलत करून तेवढेच मापाचे दागिने देऊ, असे सांगत पाटणकर यांना परत पाठवले. त्यांनंतर पाटणकर यांनी सातारा गुन्हे अन्वेषण शाखेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानुसार सातारा जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून याप्रकरणी मँग फिनसर्व्ह कंपनीवर भा.द.वि. नुसार कलम ४०२, ४०६, ४२० अंतर्गत कंपनीचे अनंत मोहाटकर यांच्यावर पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पाटणकर यांनी या कंपनीकडून याप्रकारे कोणी फसविले गेले असतील तर त्यांनी सुद्धा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.