maharashtra

वर्दीसाठी ‘शिवबा’ धावली!

शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सविता शिंदे यांनी केली महिला पोलिसांना मदत

समाजासाठी दक्ष असणार्‍या आणि कर्तव्यावर कायम असणार्‍या परंतू अडचणीत सापडलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलना अर्ध्या रात्री मदत करुन शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सविता शिंदे यांनी खरोखरीच माणुसकी जिवंत असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

सातारा : समाजासाठी दक्ष असणार्‍या आणि कर्तव्यावर कायम असणार्‍या परंतू अडचणीत सापडलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलना अर्ध्या रात्री मदत करुन शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सविता शिंदे यांनी खरोखरीच माणुसकी जिवंत असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
आपल्या कर्तव्य कठोर भूमिकेबाबत पोलीस दल आपणा सर्वांसच परिचित आहे. वरिष्ठांनी सांगितलेली जबाबदारी अगदी कोणत्याही वेळेची तमा न बाळगता हे पोलीस उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपल्या हितासाठी, न्यायासाठी दक्ष राहत आपली जबाबदारी पार पाडीत असतात. ड्युटीपुढे आपल्या तहानभुकेचीही पर्वा न करणार्‍या या पोलिसांना खरेतर समाजाने आदरानेच वागविण्याची गरज असताना काही समाजकंटक यांच्यावर हात उचलायलाही कमी करीत नाहीत. हे पाहता मन विषन्न होते.
मराठा आरक्षणासंदर्भात दहिवडी येथे शिवबा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होती. या सभास्थानी लाखो श्रोता येणार याची जाणीव असल्याने पोलीस प्रशासनाने जादा कुमक पाठवली होती. जरांगे पाटलांची सभा आटोपताच सर्वजण आपापल्या घरी जायला निघाले. मात्र, सातारा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणार्‍या दोन महिला भगिनी एवढ्या रात्री घरी जायला निघाल्या. दहिवडी-सातारा या रस्त्यावर जास्त प्रमाणात वाहतूकही नसते. त्यातून घाटात काहीवेळेस लुटारुंची टोळी असण्याची शक्यताही नाकारुन चालणारी नव्हती. अशावेळी या दोघी घरी जायला निघाल्या होत्या. ही बाब शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सविता शिंदे यांच्या निदर्शनास आली. महिला अडचणीत असल्याचे पाहून त्यांनाही राहवेना. त्यांनी संबंधित दोन्ही महिला पोलिसांना आपल्या गाडीत घेवून त्यांना सुखरुपपणे सातारा शहर पोलीस ठाण्यात आणून सोडले. त्या महिला पोलिसांना शहर पोलीस ठाण्यात सोडताच त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव शिंदे यांना खूपच भारावून गेले.
ही माहिती समजताच विविध स्तरातील मान्यवरांनी सविता शिंदे यांचे प्रत्यक्ष भेटून वा दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.