सातारा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाला मारहाण करून टाकले चुन्याच्या निवळीत
दारू पिलेल्या युवकांचे कृत्य
येथील रविवार पेठेत असणाऱ्या लोणार गल्लीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या एका युवकाला चुन्याच्या निवळीत टाकल्याने त्याच्या हाताला गंभीर इजा झाली. समाधान महादेव मुळीक वय २९, रा. रविवार पेठ, सातारा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा : येथील रविवार पेठेत असणाऱ्या लोणार गल्लीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या एका युवकाला चुन्याच्या निवळीत टाकल्याने त्याच्या हाताला गंभीर इजा झाली. समाधान महादेव मुळीक वय २९, रा. रविवार पेठ, सातारा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. समाधान मुळीक याला चुन्याच्या निवळीत टाकून मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक केली जाईल, अशी माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथील रविवार पेठ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे धायगुडे अकॅडमीतील सात ते आठ विद्यार्थी वास्तव्य करीत आहेत. आज सकाळच्या सुमारास समाधान मुळीक हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्या ठिकाणी नितीन सोडमिसे नावाचा युवक काही दारू पिलेल्या युवकासमवेत त्या ठिकाणी दाखल झाला. त्याने समाधान मुळीक याला मारहाण करत चुन्याच्या निवळीत टाकून दिल्यामुळे मुळीक याचा हात गंभीररीत्या भाजला आहे. दरम्यान मुळीक याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
नितीन सोडमिसेवर कारवाई करा : मुळीक
याबाबत समाधान मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला, धायगुडे अकॅडमीत आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सात ते आठ विद्यार्थी रविवार पेठेत वास्तव्य करीत असून काही कारण नसताना नितीन सोडमिसे आम्हाला सातत्याने त्रास देत आहे. त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी आपली मागणी आहे.
संबंधितांवर कठोर कारवाई करणार : निंबाळकर
रविवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एका युवकाला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकल्याची घटना घडल्यानंतर संबंधित जखमी युवकाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस त्या युवकाचे जाबजबाब घेत असून त्यानंतर संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती भगवान निंबाळकर यांनी दिली.


