महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांना न्याय मिळाला नाही
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची साताऱ्यात टीका
गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.
सातारा : गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.
साताऱ्यात आयोजित शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, निलेश मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हास्तरावरुन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. नियुक्त झालेल्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देवून ना. शंभूराज देसाई, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
यांची झाली नियुक्ती - सातारा जिल्हा संपर्कप्रमुख- शरदराव कणसे, सातारा जिल्हा सह संपर्क प्रमुख- एकनाथ ओंबळे, सातारा जिल्हा संघटक- चंद्रकांत जाधव, सातारा जिल्हा प्रमुख- पुरूषोत्तम जाधव, सातारा जिल्हाप्रमुख- जयवंत शेलार, सातारा शहर प्रमुख- निलेश मोरे, उपजिल्हाप्रमुख सातारा विधानसभा- संदीप पवार, अक्षय मोहिते- उपजिल्हाप्रमुख कराड दक्षिण, निलेश पवार- उपजिल्हाप्रमुख कोरेगाव विधानसभा, सातारा तालुकाप्रमुख- श्यामराव लोटेकर, उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, वाई विधानसभा- जावली तालुकाप्रमुख- शांताराम कदम, महाबळेश्वर शहर प्रमुख- विजय नायडू, लोणंद शहर प्रमुख- उमेश बेंद्रे, शिरवळ शहर प्रमुख- ज्ञानेश्वर भांडे, खटाव तालुका प्रमुख- ज्ञानेश्वर काटकर, महाबळेश्वर तालुकाप्रमुख- विजय भिलारे, वाई तालुका प्रमुख- अक्षय चव्हाण, कोरेगाव तालुका प्रमुख संजय काटकर.
ना. देसाई म्हणाले, सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 साली सरकार स्थापनेवेळी दिला होता. त्यावेळी आम्हाला वाटले भाजप-शिवसेना युती होणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसात तो शब्द फिरला आणि राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले जाणार, असे पक्षप्रमुखांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी याला विरोध केला होता. कारण हे दोन्ही पक्ष शिवसेना खाऊन टाकतील आणि आपला पक्ष संपवतील, हे आम्ही सांगितले होते. शिवभोजन केंद्र सुरु करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. अडीच वर्षात एकही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही. राष्ट्रवादी नेत्यांनी यादी दिली की मंजूर, असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरु होता. या अडीच वर्षात कोणताही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही.
आज मातोश्रीवर ओपन प्रवेश आहेत. गेल्या अडीच वर्षात वेगळेच चित्र होते. मुख्यमंत्री दालनात कोविड होता अन शेजारी असणाऱ्या उपमुख्यमंत्री दालनात कोविड नव्हता, असे चित्र दिसले. शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करायचे आहे.
आ. महेश शिंदे म्हणाले, आम्ही जनतेशी गद्दारी केली असे अनेकजण बोलत आहेत. आम्ही जनतेशी गद्दारी केली नाही. उलट तुम्ही जनतेशी गद्दारी केली आहे. ठाकरे कुटुंबात दोन मंत्रीपदे असताना तुम्ही जनतेची सेवा न करता घरात बसलात. खरे गद्दार तुम्ही आहात आम्ही नाही. जिल्हयात शिवसेना व भाजपची ताकद वाढवण्यावर भर देणार आहे. काही जण तिकडे राहिलेली आहेत. उद्या ते आपल्याबरोबरच येणार आहेत. आगामी काळात पूर्ण ताकदीने काम करायचे आहे त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना त्यांनी केल्या.


