maharashtra

बँकेच्या अधिकाऱ्यानेच लुटल्याचा बनाव करुन बँकेच्या पैशावर मारला डल्ला !


The bank official pretended to be a robber and hit the bank money!
बंधन बँक लि. शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेल्या समाधान भिमराव वजाळे (वय २३, सध्या रा.स्वामी विवेकानंदनगर, फलटण) याने आपणास 4 जणांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटल्याची तक्रार मंगळवार दि.22 फेब्रुवारी ला दिली होती. मात्र तपासात तक्रारदारानेच बँकेच्या पैशावर डल्ला मारण्याची शक्कल पुढे आल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली.

फलटण : बंधन बँक लि. शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेल्या समाधान भिमराव वजाळे (वय २३, सध्या रा.स्वामी विवेकानंदनगर, फलटण) याने आपणास 4 जणांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटल्याची तक्रार मंगळवार दि.22 फेब्रुवारी ला दिली होती. मात्र तपासात तक्रारदारानेच बँकेच्या पैशावर डल्ला मारण्याची शक्कल पुढे आल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बंधन बैंक लि. शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेले समाधान भिमराव वजाळे याने दि. २२ फेब्रुवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली की, दुपारी १.१५ वा. चे सुमारास ते बंधन बँकेच्या कलेक्शनचे ७३ हजार ४६५ रुपये घेऊन अलगुडेवाडीहुन गोखळी गावच्या दिशेने जात असताना दोन मोटार सायकलवरुन आलेल्या चौघाजणांनी त्यांचा पाठलाग करून खटकेवस्ती जवळील चव्हाणपाटी येथे गाठुन त्यांच्या डोळ्यात चटणीची पुड टाकुन त्यांचेकडील ७३ हजार ४६५ रुपये ही रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली आहे. समाधान भिमराव बजाळे यांनी वरीलप्रमाणे हकिकत सांगितल्यावर त्याच्या तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
त्यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स.पो.नि.अक्षय सोनवणे, स.पो.नि.दत्तात्रय दराडे व पो.उ. नि.सागर अरगडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करुन त्यांना तपासकामी सूचना देऊन रवाना केले.
पो.नि. धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार तक्रारदार समाधान भिमराव वजाळे यांनी दाखविलेल्या घटनास्थळाला भेट देऊन तपासाची दिशा निश्चित करुन त्यादृष्टीने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यामध्ये तक्रारदार यांनी चोरट्यांनी त्यांचा ३ कि.मी. पर्यंत पाठलाग केल्याचे तक्रारीत सांगितले आहे. परंतु त्यांचे मोटार सायकलला आरसे नसल्याचे दिसून आले. यावरुन तक्रारदार काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्यामुळे पुन्हा तक्रारदाराकडे तपासामध्ये समोर आलेल्या वरील मुद्द्यांबाबत विचारपूस केली असता तो उलटसुलट माहिती सांगु लागला. त्यावेळी त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळपासून दुपारपर्यंत बंधन बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रोख रक्कम ७३ हजार ४६५ रुपये हडप करण्याच्या दृष्टीने त्याचा गावाकडील मित्र महंम्मद हमीद नदीफ मोमीन (वय २२, रा. कांतीगल्ली, अकलुज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) यास फलटणमध्ये बोलावुन घेतले होते. त्यानंतर दोघांनी दरोड्याचा बनाव करण्याचा प्लॅन केला. त्यामध्ये ठरल्यानुसार महंम्मद हमीद नदीफ मोमीन हा पैसे घेऊन गेल्यानंतर त्याने जवळच्याच एका गावातील किराणा दुकानातून चटणीची पुड विकत घेऊन ती स्वतःच्या डोळ्यावर टाकल्याचा बनाव करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास खोटी तक्रार दिली आहे.
गुन्ह्याच्या तपासामध्ये तक्रारदारासह त्याचा साथीदार असलेल्या महम्मद हमीद नदीफ मोमीन यास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडुन गुन्हा करताना त्यांनी वापरलेले दोन मोबाईल हॅण्डसेट व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार दादासो यादव, मोहन काळे, शोभाताई खाडे, उर्मिला पेंदाम, पो.ना.वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, रुपाली भिसे व गणेश अवघडे यांनी केली आहे.