सातारा येथे खासगी कंपनीच्या कर्मचार्याला १ लाख ५६ हजाराला लुटले
भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
येथील पोवई नाक्याजवळ आज सकाळी बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या एका खासगी कंपनीचा कर्मचारी अरुण धनराज गुजले, वय २४, रा. वेळे कामथी, ता. सातारा याला दोघांनी अडवून मारहाण केली. त्यांनंतर त्याच्या जवळील १ लाख ५६ हजार रुपये लुटले.
सातारा : येथील पोवई नाक्याजवळ आज सकाळी बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या एका खासगी कंपनीचा कर्मचारी अरुण धनराज गुजले, वय २४, रा. वेळे कामथी, ता. सातारा याला दोघांनी अडवून मारहाण केली. त्यांनंतर त्याच्या जवळील १ लाख ५६ हजार रुपये लुटले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरुन गेला असुन भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, लुटमारीत जखमी झालेला अरुण धनराज गुजले हे एका खासगी कंपनीत काम करत आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास ते बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी सिव्हील रोडवरील पोवई नाक्यावर आल्यानंतर पोवई नाका ते सदरबझार जाणाऱ्या मार्गावर त्यांना दोन अज्ञात युवकांनी अडवले. आमच्या दुचाकीला कट का मारला, असे म्हणत त्यांच्यात वाद झाला. यावेळी दोघांनी त्यांच्याकडील असलेली १ लाख ५६ हजार एवढी रोख रक्कम ताब्यात घेऊन त्यांनी तेथून पलायन केले.
अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या घटनेनंतर त्यांने आरडाओरडा केला. परंतु संशयित तेथून पसार झाले. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मारहाणीमध्ये मुक्का मार लागलेल्या अरुण गुजले याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातार्यात भरदिवसा लुटमार करुन रोकड नेल्याने परिसर हादरुन गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यानुसार पोलिस संशयिताचा तपास करत आहेत.


