maharashtra

मलवडी खून प्रकरणातील आरोपी तीन तासात जेरबंद

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई

फलटण ग्रामीण पोलिसांनी मलवडी खून प्रकरणातील आरोपी केवळ तीन तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

सातारा : फलटण ग्रामीण पोलिसांनी मलवडी खून प्रकरणातील आरोपी केवळ तीन तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलवडी, ता. फलटण येथील रहिवासी असलेले अनिल नामदेव चव्हाण वय 42 हे नेहमीप्रमाणे प्रात:विधीसाठी मलवडी गावच्या हद्दीतील फॉरेस्ट नावाच्या शिवारात गेले असता अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. या प्रकरणी मयत अनिल चव्हाण यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस हे गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे या गुन्ह्याचा तपास करीत असताना मृत अनिल चव्हाण यांचा खून हा महिलांबाबतच्या त्यांच्या गैरवर्तणुकीच्या कारणावरून झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतु त्यांचा सख्खा मावस भाऊ असलेला पोपट खाशाबा मदने हा तो मी नव्हेच या आविर्भावात गुन्ह्याच्या घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीमध्ये वावरत होता व पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. परंतु पोलिसांनी बघ्यांच्या गर्दी मधून संशयित पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोली चाणाक्षपणे हेरून त्यास संशयाच्या आधारे चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला तीन तास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करणारी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण रीतीने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल नामदेव चव्हाण यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दीक्षित, पोलीस उपनिरीक्षक पाटील, अंमलदार संजय अडसूळ, गार्डी, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे यांनी केली आहे.