maharashtra

एसटी कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे महामंडळाचे आश्वासन

The corporation claims that ST employees will be re-employed
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन महामंडळाने दिले असून त्यासाठी पोलिसांशी चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
संपामुळे गुरुवारीही राज्यातील विविध आगार बंदच राहिले. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे भाडे आकारून आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडण्यात आल्या. परंतु काही आगारांबाहेरच खासगी बसगाड्या उभ्या करुन अतिरिक्त दरात प्रवासी घेऊन जाण्याचे प्रकार घडत होते. प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि अव्वाच्यासवा भाडे आकारणी याविरोधात होणाऱ्या कारवाईकडे परिवहन विभागाचे मात्र दुर्लक्षच झाले. दरम्यान, गुरुवारीही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने केली. काही आगारांच्या प्रवेशद्वारांवरच कर्मचारी ठाण मांडून बसले होते. काही आगारांना पोलिसांच्या छावणीचेही स्वरुप आले होते.
आझाद मैदानातही मोठ्य़ा प्रमाणात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी दिली जात होती. यात विलीनीकरणाची मागणी घेऊन काही कर्मचारी हाती फलक घेऊन उभे होते. संपाची तीव्रता पाहता एसटी महामंडळाने संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी २९ विभागातील १ हजार १३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. ९ नोव्हेंबरला ३७६ कर्मचाऱ्यांवर तर १० नोव्हेंबरला ५४२ जणांवर कारवाई केल्याने आतापर्यंत एकूण निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे.