यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीला परवानगी नाही
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची स्पष्टोक्ती
यंदाच्या गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सातारा शहरात डॉल्बी वाढवण्यासाठी अजिबात परवानगी दिली जाणार नाही याची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्पष्टपणे नोंद घ्यावी, अशी माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
सातारा : यंदाच्या गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सातारा शहरात डॉल्बी वाढवण्यासाठी अजिबात परवानगी दिली जाणार नाही याची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्पष्टपणे नोंद घ्यावी, अशी माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
सातारा शहरात सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता कमिटी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी वाजवण्यास परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी केली होती. डॉल्बी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या सादर केल्या होत्या. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडेही या संदर्भात पाठपुरावा करून त्यांच्याशी चर्चा केली होती. डॉल्बीला सशर्त परवानगी देण्याच्या संदर्भातील चर्चा झाल्याने परवानगी दिली गेली काय, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र प्रसारमाध्यमांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली.
निंबाळकर म्हणाले, शांतता कमिटीच्या बैठकीत साऊंड सिस्टिम मर्यादित स्वरूपात लावायला परवानगी आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे. जास्त डेसिबल अनुषंगाने कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सातारा शहरात डॉल्बीला कोणत्याही स्वरूपात परवानगी दिली जाणार नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे डॉल्बीला परवानगी मिळाली आहे, असे कोणत्याही मंडळाने समजू नये. शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गणेशोत्सवाच्या दृष्टिकोनातून या नियमांचे पालन करावे, असे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन गणेशोत्सव मंडळांनी जरूर करावे व सर्वांनी गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने पार पडेल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले.


