maharashtra

तिसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलनाची सांगता

धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न : डॉ. राजा दीक्षित

Concluding remarks of the third Writer-Publisher Conference
साहित्य संमेलन आणि वाद यांचे जवळचे नाते असते. त्यामुळे कोणतेही संमेलन घेताना काळाचा संदर्भ घेणे गरजेचे असते. आजच्या काळामध्ये विचार महत्त्वाचा आहे. सध्या अस्वस्थतेचे युग सुरू आहे आणि धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न विविध शक्तींकडून केला जात आहे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

सातारा : साहित्य संमेलन आणि वाद यांचे जवळचे नाते असते. त्यामुळे कोणतेही संमेलन घेताना काळाचा संदर्भ घेणे गरजेचे असते. आजच्या काळामध्ये विचार महत्त्वाचा आहे. सध्या अस्वस्थतेचे युग सुरू आहे आणि धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न विविध शक्तींकडून केला जात आहे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
सातारा येथील शाहू कलामंदिरात आयोजित तिसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, या संमेलनाचे अध्यक्ष वसंत गुर्जर, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले की, विविध धर्मांचे हजारो वर्षांचे सहजीवन भंग पावत आहे. बहुसांस्कृतिकता आणि बहुधार्मिकता जपणे हे आपल्या देशांमध्ये सर्वाधिक गरजेचे आहे. मात्र आजच्या काळात सार्वत्रिक दुजाभाव आणि विषमता वाढते आहे. तसेच सर्वपक्षीय फॅसिजममध्येही वाढ होत आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. कारण इतिहासाला पूर्णविराम नसतो. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांमध्ये महापुरुषांचे अपहरण आणि इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. मात्र एकसंध राष्ट्र भावनेला हे घातक आहे. आजच्या काळात  विवेकी आणि संयमी आत्मभान हवे आहे, हे आत्मभान समाजाला देण्याची जबाबदारी साहित्यिकांवर आहे. ग्रंथांची व्याख्या करता येत नसली तरी ग्रंथ आणि वाचन संस्कृती जोपासणे ही जाणीव व्हायला हवी. भिलारप्रमाणे प्रत्येक गाव पुस्तकांचे गाव व्हायला हवे. केरळमध्ये आणि काही युरोपीय देशांमध्ये ग्रंथ ही जशी जीवनावश्‍यक वस्तू बनली आहे, तसे आपल्याकडेही ग्रंथ जीवनावश्यक वस्तू बनली पाहिजे. तसे झाले तर लेखक-प्रकाशक संमेलनाचा उद्देश सफल होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत देवधर यांनी केले. शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.