maharashtra

गोटे येथे दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार

बापाला अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

गोटे, ता. कराड येथे पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याचा राग मनात धरून पतीने आपल्या दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. पोलिसांनी बाबासो वायदंडे रा. गोटे, ता. कराड याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सातारा : गोटे, ता. कराड येथे पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याचा राग मनात धरून पतीने आपल्या दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. पोलिसांनी बाबासो वायदंडे रा. गोटे, ता. कराड याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मुले शिवम व श्लोक अशी जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. यापैकी श्लोक वायदंडे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामदास वायदंडे हा रविवारी दि. १८ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून त्याच्या पत्नीचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन का केले? व तिला माहेरी का पाठवले? या कारणावरून घरांमध्ये भांडण करीत होता. मुले  श्लोक रामदास वायदंडे वय ५  व शिवम रामदास वायदंडे वय ६ यांना हाताने मारहाण करीत होता. तसेच इंदुबाई वायदंडे हिच्यासह आज कोणालाच सोडणार नाही, असे म्हणत होता. त्यामुळे इंदुबाई या शिवम व श्लोक यांना घेऊन घराबाहेर बसल्या होत्या. रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास मुले खेळत घरामध्ये गेली. त्यांच्या पाठीमागून इंदुबाई याही घरामध्ये गेल्या. तेव्हा रामदास याने घरामधील कोयता हातात घेऊन शिवीगाळ करत आता तुम्हाला ठार मारून टाकतो, असे म्हणून शिवम व श्लोक यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये श्लोक गंभीर जखमी झाला. तर शिवम याच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार झाल्याने तोही जखमी झाला. यावेळी इंदुबाई वायदंडे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी रामदास वायदंडे याच्या हातातील कोयता हिसकावून घेत जखमी श्लोक व शुभम या दोन चिमुकल्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची फिर्याद दिलीप गुलाब तुपे रा. मुंढे यांनी शहर पोलिसांत दिली असून पोलिसांनी संशयित रामदास वायदंडे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.