‘एवढे अंगावर दागिने कशाला घातले आहेत,’ ते काढून द्या तुम्हाला बांधून व्यवस्थित ठेवायला देतो, असे सांगून तीन अनोळखी युवकांनी मुख्याध्यापिका असलेल्या महिलेचे 1 लाख 57 हजार रुपये किंमतीचे दागिने लुबाडले. हातचलाखीने सातार्यात फसवणार्या टोळीचा सिलसिला सुरुच असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा : ‘एवढे अंगावर दागिने कशाला घातले आहेत,’ ते काढून द्या तुम्हाला बांधून व्यवस्थित ठेवायला देतो, असे सांगून तीन अनोळखी युवकांनी मुख्याध्यापिका असलेल्या महिलेचे 1 लाख 57 हजार रुपये किंमतीचे दागिने लुबाडले. हातचलाखीने सातार्यात फसवणार्या टोळीचा सिलसिला सुरुच असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवगंगा विठ्ठलराव सरवदे (वय 57, रा. सदरबझार, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या मुख्याध्यापिका आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 21 रोजी सकाळी सदरबझार येथील सारंग मंगल कार्यालया समोरील रस्त्यावर घडली आहे. तक्रारदार महिला पायी चालत असताना त्याठिकाणी तीन युवक आले. त्यांनी महिलेला थांबण्यास सांगून ‘मॉब लिचिंग सुरु आहे. आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आहे. तुमच्या अंगावर असलेले दागिने काढून व्यवस्थित ठेवा,’ असे म्हणत संशयितांनी विश्वास संपादन केला.
यावेळी महिलेने अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केल्यानंतर संशयितांनी ते स्वत:कडे मागून घेत दागिने एकत्र बांधून नीट देतो, असे सांगितले. दागिने काढल्यानंतर ते पर्समध्ये ठेवल्याचे संशयितांनी भासवले. अवघ्या 10 मिनिटांमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संशयित तेथून पसार झाले. महिलेने थोड्या वेळात पर्समध्ये पाहिले असता त्यामध्ये दागिने नसल्याचे समोर आले. तात्काळ संशयितांचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून ते पसार झाले होते. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने महिलेने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञातांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सातारा शहरातील वाढत्या अशा घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


