सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार!
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी’बद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
सातारा : सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि NAFSCOB यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषदेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी’बद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
केंद्रीय सहकार मंत्रालय हे भारत सरकारच्या अंतर्गत मंत्रालय असून 6 जुलै 2021 रोजी स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रीय सहकार मंत्रालयाचा देशातील सहकारी चळवळ मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक फ्रेमवर्क प्रदान करणे तसेच सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करण्याचा उद्देश आहे. तळागाळातील सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी, सहकारी संस्थांसाठी ’व्यवसाय सुलभ करण्यासाठी’ प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि बहु-राज्यीय सहकारी संस्थांचा विकास सक्षम करण्यासाठी कार्य करते. याचे नेतृत्व केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शाह करीत आहेत.
सहकार मंत्रालय बळकट करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि स्पर्धात्मक सहकारी संस्था निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी विकासाच्या सुलभतेचे आव्हान पेलण्यासाठी सहकार मंत्रालय सतत काम करणार आहे. सहकार चळवळ वाढीसाठी अनेक बाबींची याप्रसंगी चर्चा झाली. विविध कार्यकारी विकास सेवा संस्थाचे संगणकीकरण करणेसाठी अर्थसहाय्य आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सर्वच प्रश्न सोडविणेकरिता हिरहिरीने सहभाग घेणेचे यावेळी अमित शह यांनी नमूद केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सहकारी बँकांना भेडसावणारे प्रश्न व सहकार संबंधी असणार्या विविध अडचणी संदर्भात विविध प्रश्नांची मांडणी केली.
सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्र संपूर्ण देशातच चांगले काम करीत आहे, परंतु, काही आव्हानेही आहेत. सहकार क्षेत्राची वाढ देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठी क्रांती होत असून, अनेक आर्थिक सुधारणाही समाजाच्या हिताच्या दृष्टीने घडत आहेत. सहकार मंत्रालयाने देशातील 351 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची गेल्या दहा वर्षातील कामकाजाची माहिती घेऊन सातारा जिल्हा बँकेच्या गेल्या दहा वर्षातील सतत सर्वोत्तम व सर्वांगीण केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तज्ञ कमिटीने दशकातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेस सन्मानित केले आहे.
संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतकर्यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.


