करंजे येथील चोरी प्रकरणी दोन जणांना अटक
शाहूपुरी पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे यश
करंजे, ता. सातारा येथील चोरी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडुन गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या टेम्पोसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा : करंजे, ता. सातारा येथील चोरी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडुन गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या टेम्पोसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोयब अशपाक शेख (वय 27, रा. करंजे पेठ, सातारा) आणि भंगार दुकानदार राजेश जगन घाडगे (वय 30, रा. भोंदवडे, ता. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी 2022 मधील पहिल्या आठवड्यात करंजे येथील एका घराच्या बांधकामातील उभ्या केलेल्या कॉलममधील 30 हजार रुपये किमतीचे लोखंडी बार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना दिल्या होत्या. पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकाला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या.
चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एक संशयित इसम दि. 3 मार्च रोजी त्याच्या राहत्या घरी करंजे येथे आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने करंजे तर्फ येथुन लोखंडी बार चोरल्याची तसेच ठोसेघरकडे जाणार्या मार्गावर असणार्या भंगार व्यावसायिकाला ते विकल्याचे सांगितले. या चोरी प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, निलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत, विजय भिंगारदेवे यांनी सहभाग घेतला.


