पाटण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंदराव देसाई
शंकरराव मोहिते कार्याध्यक्ष, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे
सन 2022-23 वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शंकरराव मोहिते, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
पाटण : सन 2022-23 वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शंकरराव मोहिते, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या. तसेच सचिवपदी भगवंत लोहार, सहसचिवपदी राजेंद्र सावंत यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
राज्य प्रतिनिधी श्रीकांत पाटील, जिल्हा प्रतिनिधी योगेश हिरवे, तर कार्यकारिणीमध्ये पाटण विभाग प्रमुख संदीप भोळे, मल्हारपेठ विभाग प्रमुख विलासराव माने, ढेबेवाडी विभाग प्रमुख सुभाष देवकर, मोरगिरी विभाग प्रमुख संदेश बनसोडे, तारळे विभाग प्रमुख एकनाथ माळी, चाफळ विभाग प्रमुख राजकुमार साळुंखे, कोयनानगर विभाग प्रमुख निलेश साळुंखे यांच्या निवडी करण्यात आल्या. तर प्रेस फोटोग्राफर प्रमुखपदी सचिन पोतदार, खाशाबा चव्हाण, नानासाहेब पवार यांची निवड करण्यात आली.
पाटण तालुका पत्रकार संघाच्या निवडीची बैठक मल्हारपेठ नाडे-नवारस्ता येथे पार पडली. बैठकीत पत्रकार संघाचे मावळते उपाध्यक्ष नितीन खैरमोडे व कार्याध्यक्ष दिनकर वाईकर, विलास माने यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवड बिनविरोध पार पडली. कोरोना काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे वर्ष-दोन वर्षात पत्रकार संघामार्फत कोणतेही उपक्रम राबविण्यात आले नव्हते. सध्या, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येत्या वर्षभरात संघामार्फत विविध कार्यक्रम राबविण्याबाबत सर्वानुमते चर्चा करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष ह.भ.प. आनंदराव देसाई यांनी कोरोना काळात अनेक निर्बंध असल्याने संघामार्फत कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यामुळे थोडासा विस्कळीतपणा आला होता. मात्र, सध्याच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता विविध कार्यक्रम राबविणे शक्य आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात सर्वांना विश्वासात घेवून चांगले उपक्रम राबवुयात. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून माझ्यावर जो विश्वास दाखविला; तो मी सार्थ ठरवेन. या निवडीमुळे माझ्यावरील जबाबदारी निश्चितच वाढली आहे. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व पत्रकारांना सोबत घेवून एकत्रित काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी सचिव भगवंत लोहार यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मागील बैठकीबाबत उहापोह केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ पत्रकार संपतराव देसाई, माजी उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, माजी कार्याध्यक्ष दिनकर वाईकर यांच्यासह पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस पाटण तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.


