संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन
ग्यानबा तुकाराम च्या जयघोषात पालखी बाजार तळाकडे रवाना
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजार तळाकडे रवाना झाली.
सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजार तळाकडे रवाना झाली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह अन्य मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले.
मंगळवार आणि बुधवार असा दोन दिवस पालखीचा मुक्काम लोणंद मध्ये आहे. माऊलींच्या पादुका स्नानाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकर्यांनी नीरा नदी काठी व दत्त घाटावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी माऊली-माऊलींचा अखंड जयघोष करण्यात आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरी साठी सर्वात मोठा उत्सव असतो. या सोहळ्याची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. दोन वर्ष कोरोना मुळे पालखी सोहळा रद्द झाला होता. यंदा भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. यंदा पावसाने संपूर्ण जून महिन्यात जरी ओढ दिली असली तरी पाऊस लवकर चालू व्हावा, असे साकडे पांडुरंग चरणी घालण्यासाठी नीरा नदीच्या पुलावर लाखो भाविक जमा झाले होते. तसेच सकाळी सात वाजल्यापासून दत्त घाटावर माउलींच्या पादुका सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविक सज्ज झाले होते.
यंदा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस, आरोग्य- नगर पंचायत कर्मचारी, महावितरण, बांधकाम विभागाचे कर्मचारी सज्ज आहेत. तसेच लोणंद शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांना कोरोना चा दुसरा डोस तसेच बूस्टर डोस देण्याची सुद्धा सोय करण्यात आली असून या ठिकाणी अकरा पथके तैनात करण्यात आली आहेत. दत्त घाटावर असताना नंतर पाडेगाव हद्दीत जिल्हा परिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच राजकीय क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती. सायंकाळी चारपर्यंत वाजत-गाजत ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पालखी नीरा-लोणंद येथील बाजार तळाकडे रवाना झाली. लोणंद नगरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून गॅस, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असून वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेटही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचबरोबर पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.


