maharashtra

सातारा येथे आंदोलकांचा एल्गार

सार्वत्रिक संपात अनेक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

Elgar of protesters in Satara
सोमवारी विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून आंदोलकांनी एल्गार केला. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी करण्यात आलेल्या सार्वत्रिक संपात अनेक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सातारा : सोमवारी विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून आंदोलकांनी एल्गार केला. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी करण्यात आलेल्या सार्वत्रिक संपात अनेक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, कृषी कायद्याप्रमाणे संसदेत कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने संपूर्ण संसदीय लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवून सप्टेंबर २०२० मध्ये लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पाशवी बहुमताच्या आधारे कामगारविरोधी सहिता मंजूर केल्यामुळे कामगारांची युनियन गठीत करणे कठीण झाले आहे. किमान वेतन, कामाचे तास, औद्योगिक कलह, सामुदायिक वाटाघाटी आदी बाबतीतील कामगारांच्या अधिकारांवर गदा आली आहे. दरम्यानच्या काळात नवीन रोजगार निर्माण करण्याऐवजी केंद्र सरकारच्या धोरणामुळे रोजगार निर्मिती मध्ये घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्राचे खच्चीकरण केले जात असून फायद्यात चालणाऱ्या रोजगार देणाऱ्या मोठ्या प्रमाणात कर देऊन सरकारचा आणि जनतेचा आधार बनलेल्या सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून त्यांना कवडीमोल भावाने विकले जात आहे. त्याचा आम्ही निषेध करून आज संप करीत आहोत.
लोकसाहित्य अण्णाभाऊ साठे कृती समितीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा शहरात मार्केट यार्ड परिसरात बस स्थानक परिसर तसेच खुद्द आपल्या कार्यालयासमोर पारधी समाजातील बेघर कुटुंबे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यातूनच खुद्द आपल्या कार्यालया समोर असलेल्या परिसरात पारधी समाजातील एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याची घटना घडली आहे. या घटनेतील नराधमास पोलिसांनी अटक केली आहे त्याबद्दल आपले तसेच पोलीस दलाचे अभिनंदन. मात्र पारधी समाजाच्या बाबतीत ही जी घटना घडली आहे ती त्यांच्यावरील गरीब परिस्थिती शिक्षण नाही राहायला घर नाही यामुळेच घडलेली आहे.  पारधी समाजाला तसेच जिल्ह्यातील इतर जातीधर्मातील लोक घरकुलापासून वंचित असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीमार्फत प्रशासनाकडे १ हजार नागरिकांचे अर्ज पडून आहेत. या नागरिकांना घरकुले मिळावीत व त्यांना जगता यावे यासाठी आपणास वारंवार निवेदने विनंत्या व चर्चा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी २०२२ पर्यंत या देशातील कोणीही नागरिक स्वतःच्या घरकुला पासून वंचित राहणार नाही अशी महत्वकांक्षी घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून इतर राज्यांमध्ये कार्यवाही सुरू आहे मात्र महाराष्ट्र राज्यात घरकुल योजनेची कार्यवाही अपेक्षित प्रमाणात झालेली नाही.
याबाबत निवेदने देण्यात आल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी घरकुलाचा प्रश्न मंत्रालयात संबंधित खात्याच्या सचिवासमोर मांडला. सचिवांनी सातारा जिल्ह्यातील पारधी समाजासह वंचित समूहातील ज्यांना घरी नाहीत अशांचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ते काम कुठपर्यंत आले, याबाबत प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल देण्याची महत्त्वाकांक्षी योजना कशी पूर्ण होणार हा सवाल आहे.
त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकीकडे करून कोरोना संसर्गाने सर्वसामान्य नागरिक व जनता वेठीस धरली गेली आहे. त्यातून आता कोठे लॉकडॉऊन उठला गेला व स्थिती सामान्य झाली असली तरी ज्या प्रचंड प्रमाणात केस पेट्रोल डिझेल व खाद्यतेल या इंधना बरोबरच जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. त्यापैकी काहींना घरे नाहीत, राहण्यास जागा नाही, हाताला रोजगार नाही अशा स्थितीत या माणसांचं जगणं सुसह्य करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र सातारा जिल्ह्यात त्या प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत असा आमचा प्रशासनावर आरोप आहे. महागाई कमी करावी, सर्वसामान्यांचं जगण सुसह्य करावे, तसेच पारधी समाजासह वंचित समूहातील विविध जाती धर्मातील लोकांना ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यावा. अन्यथा भविष्यात तरी आम्ही यासाठी तीव्र आंदोलन करू.
दोन दिवस संपूर्ण अंगणवाड्या बंद ठेऊन संप यशस्वी
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्ससह ११ केंद्रीय कामगार संघटनेच्यावतीने संप केला तसेच दोन दिवस अंगणवाड्या बंद ठेवून सेविका मदतनीस संपात सहभागी झाल्या. संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे धोरण रद्द करा, महागाई कमी करा, सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरित भरा, सुपरवायझरच्या जागांची भरती त्वरित करा, आधुनिक मराठी ॲप असलेले अँड्रॉइड फोन त्वरित द्या, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय सेवेत समाविष्ट करा आदी मागण्यांसाठी संप करण्यात आला. संपामध्ये मालन गुरव, प्रतिभा भोसले, मनीषा काटकर, भारती चव्हाण, चंद्रकला शिंदे, अर्चना सावंत, अर्चना साळुंखे, भारती आहिरेकर, प्रतिभा भोसले, छाया पंडित, सीमा जाधव, उषा पवार, शोभा शिवदे, बेबी मोहिते, निलोफर मुल्ला, सुनंदा वसव आदी सहभागी झाले होते.