maharashtra

सातारा जिल्हा बँकेच्या वतीने यशोधन अनाथ आश्रमास आर्थिक मदत !


Financial assistance to Yashodhan Orphanage on behalf of Satara District Bank!
मानवता हीच ईश्वर सेवा, या उक्तीचा तंतोतंत अनुभव म्हणजे, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावच्या हाद्दीतील ’यशोधन अनाथ आश्रम’ रवि बोडके या फलटण तालुक्यातील माणुसकीच्या हट्टासाठी झपाटलेल्या माणसाचे तरुणाईतील कर्तृत्व भारारून टाकणारे आहे.

सातारा : मानवता हीच ईश्वर सेवा, या उक्तीचा तंतोतंत अनुभव म्हणजे, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावच्या हाद्दीतील ’यशोधन अनाथ आश्रम’ रवि बोडके या फलटण तालुक्यातील माणुसकीच्या हट्टासाठी झपाटलेल्या माणसाचे तरुणाईतील कर्तृत्व भारारून टाकणारे आहे. माणूस म्हणून जगण्याचा अर्थ समजायचा असेल तर या संस्थेस संस्थेतील निराधार, अत्याचारीत, पिडीत, मनोरुग्ण माणसांना आवर्जून भेटलं पाहिजे. खरंतर अनाथ हा शब्द अंगावर काटा आणणारा आहे. परिस्थितीचे चटके बसल्येल्या या माणसांना आधार देत पुन्हा त्यांच्या कुटुंबात सोडणारा रवींद्र बोडके हा अवलिया सातारा जिल्ह्यात आहे, हे किती माणसांना माहिती आहे?
सातारा जिल्हा बँक जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी, कष्टकरी यांच्या मदतीकरिता नेहमीच पुढे असते. जिल्ह्यातील दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, कोव्हीड महामारी असो जिल्हा बँकेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. वेळे ता. वाई येथील या आधार आश्रमाला त्याच भावनेतून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन (काका) पाटील व सर्व संचालक मंडळ सदस्यांसमवेत नुकतीच भेट देवून या आश्रितांची आस्थेने विचारपूस केली. माणसाला माणसातून उठण्याची वेळ या अश्रीतांवर का आली हे जाणून घेतले. आश्रामात दिवसेंदिवस वाढणारी माणसांची संख्या व ती का वाढत आहे याची माहिती रवी बोडके यांच्याकडून ऐकल्यावर मन सुन्न झाल्याशिवाय रहात नाही. माणुसकीचा झरा सातारा जिल्ह्यात थोडा का होईना तेवत राहिला आहे, याचे समाधान मान्यवरांनी अनुभवले.
यशोधन आश्रमाच्या आवर्जून भेटीप्रसंगी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने संपूर्ण दिवस त्या ठिकाणी देऊन बँकेमार्फत रक्कम रु. 3 लाखाची आर्थिक मदत संस्थेस प्रदान केली. जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील हेही त्याठिकाणी अगोदरच उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा मदतीचा धनादेश संस्थेस देण्यात आला.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील साहेब तसेच बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, रामराव लेंभे, सुरेश सावंत, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांच्या हस्ते रवी बोडके यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त केला.
याप्रसंगी श्रीनिवास पाटील म्हणाले, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत पुरुष व महिला बरेच कारणांनी निराधारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचे उद्ध्वस्त जीवन बसविण्याचा प्रयत्न करणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. रवी बोडके यांनी घरची परिस्थिती आणि अनेक संकटांवर मात करत त्यांनी अनाथ लोकांचे पालकत्व स्वीकारले. परिस्थितीवर मात करत अनाथ लोकांचे पालकत्व स्वीकारले असून ते ही जबाबदारी खंबीरपणे पार पाडत आहेत. रवी बोडके यांनी अशा प्रकारच्या दुर्दैवी जीवांना आधार देण्याकरिता पुढे येऊन महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला आहे. सातारा जिल्हा बँकेला चांगला इतिहास असून स्व. यशवंतराव चव्हाण, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर, विलासकाका उंडाळकर, भाऊसाहेब महाराज, लक्ष्मणराव पाटील या महान नेत्यांचे नेतृत्व लाभलेमुळे चांगली आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व राजकारण विरहीत कामकाज केले जात असून बँक आर्थिकदृष्टया भक्कम आहे. बँकेच्या सर्वंकष कामकाजामुळे बँकेचा नावलौकिक सबंध देशात झालेला आहे. यशोधन ट्रस्टला मदत करून सातारा जिल्हा बँक अनाथांच्याही पाठीशी उभी असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी नितीन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही कायमच सामाजिक बांधिलकी जपत असून जिल्हा बँकेने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. यशोधन मध्ये अनाथ, वयोवृद्ध मनोरुग्णांचा मोफत सांभाळ करीत असलेची बाब भूषणावह आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत कृषी व सहकारी क्षेत्रातील कार्य बँक आज तळमळीने व निष्ठेने करीत असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध प्रकारे अर्थसहाय्य केलेले आहे. याची जाणीव ठेऊन बँकेने आर्थिक मदत केलेली आहे. तसेच मागील वर्षात बँकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच कोव्हीड सेंटरला रु. 3 कोटीचे व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर उपलब्ध करून देऊन सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, यशोधन आश्रमाच्या माध्यमातून रवी बोडके यांनी जिल्हाभर फिरून भीक मागत फिरताना काही अनाथ लोक आढळले तर कायदेशीर पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय या लोकांचा सांभाळ करतात, ही बाब कौतुकास्पद आहे. निराधारांना त्यांच्या आई-वडिलांची व कुटुंबाची आणि प्रेमाची उणीव भासणार नाही, अशा पद्धतीने लळा लावून त्यांचे संगोपन केले जाते. समाजाप्रति आपलेही काही देणे लागते, या विचाराने प्रेरित होऊन सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने यशोधन ट्रस्ट साठी आर्थिक मदत करणेच निर्णय घेतला. बँकेविषयी बोलताना डॉ. सरकाळे म्हणाले, बँकींग कामकाजाबरोबर जिल्हयातील विकासाभिमुख कामात बँक नेहमीच अग्रेसर आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेने सामाजिक बांधिलकी जपत शासनास आर्थिक मदत करून देऊन सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. याव्यतिरिक्त बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक तसेच विविधरूपाने सर्वतोपरी मदत केली आहे.
यावेळी रवी बोडके यांनी सातारा जिल्हा बँकेनी केलेली मदत मोलाची असलेच्या भावना व्यक्त केल्या. यशोधन आश्रमास पुढील वाटचालीस बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी यांनी तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी सेवक वर्ग यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.