नगरपंचायतीच्या आखाड्यात पुन्हा राष्ट्रवादीची बाजी
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे गटाला धक्का
दहिवडी पाटण खंडाळा लोणंद या चार नगरपंचायतीत विरोधकांना धूळ चारत राष्ट्रवादीने आपली पाळेमुळे घट्ट रोवली. कोरेगाव नगरपंचायत मात्र शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाला धूळ चारत 13 पैकी नऊ जागांवर बाजी मारली. वडूजमध्ये भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्या पॅनेलने आपले वर्चस्व सिद्ध केले, मात्र तरीही तेथील चार अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्यात सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहापैकी चार नगरपंचायती आपल्याकडे राखत राष्ट्रवादीने पुन्हा आपला झेंडा रोवला आहे. दहिवडी पाटण खंडाळा लोणंद या चार नगरपंचायतीत विरोधकांना धूळ चारत राष्ट्रवादीने आपली पाळेमुळे घट्ट रोवली. कोरेगाव नगरपंचायत मात्र शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाला धूळ चारत 13 पैकी नऊ जागांवर बाजी मारली. वडूजमध्ये भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्या पॅनेलने आपले वर्चस्व सिद्ध केले, मात्र तरीही तेथील चार अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी या सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य शासनाने जाहीर केली होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या जागांच्या निवडणुका तहकूब करत उर्वरित ठिकाणचे मतदान घेण्यात आले होते. ओबीसीच्या जागांची स्वतंत्रपणे झालेल्या निवडणुकीत एकूण 23 जागांसाठी 82 उमेदवार रिंगणात होते. डिसेंबर महिन्यात 79 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्या सर्व जागांचा एकत्रित निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने दहीवडी, पाटण, खंडाळा नगरपंचायतीमध्ये बाजी मारली. पाटण नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमसिंह पाटणकर गटांची सत्ता कायम राहिली. 17 पैकी 15 जागा जिंकत पारंपारिक प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला त्यांनी अस्मान दाखवले. जिल्हा बँकेच्या पराभवानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना हा दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला आहे. लोणंद, खंडाळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाने प्रत्येकी दहा जागा राखत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. लोणंद नगरपंचाय राष्ट्रवादीला दहा, भाजपला तीन, काँग्रेसला तीन, तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली. एका जागेचा निर्णय चिठ्ठीवर गेला. तेथे क्रमांक 11 प्रभागात राष्ट्रवादीचे भरत बोडरे, शिवसेनेचे विश्वास शिरतोडे यांना प्रत्येकी 327 मते मिळाली. चिठ्ठीवर जो निकाल झाला त्याचे माप राष्ट्रवादीच्या पदरी पडले. त्यामुळे शिवसेनेचे शिरतोडे खाते उघडू शकले नाहीत. लोणंद नगरपंचायतीत मकरंद पाटील गटाला 10, भाजपचे आनंदराव शेळके यांच्या गटाला तीन, काँग्रेस पक्षाला तीन, एका जागेवर अपक्ष निवडून आला. भाजपशी हात मिळवणी करून राष्ट्रवादीला आसमान दाखवण्याच्या प्रयत्नात आनंदराव शेळके यांनाच लोणंदकरांनी घरचा रस्ता दाखवला. काँग्रेससुद्धा लोणंद मध्ये चमत्कार दाखवू शकली नाही. त्यांना तेथे तीन जागांवर समाधान मानावे लागले. दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे गटाला राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख गटाने मोठा धक्का दिला. येथे राष्ट्रवादीला आठ, भाजपला पाच, शिवसेनेला 3 व अपक्ष म्हणून एक उमेदवार निवडून आला. वडूज नगरपंचायतीत भाजपच्या आमदार जयकुमार गोरे समर्थकांचा गट अपेक्षेप्रमाणे विजयी ठरला. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात कडवी झुंज झाली. गोरे गटाला सहा, तर राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या. येथे चार अपक्ष निवडून आले. काही ठिकाणी गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसला. त्यामुळे अपक्षांची सरशी झाली. सत्ता स्थापनेमध्ये अपक्षांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसला एक जागा मिळाली. कोरेगाव नगरपंचायतीत सर्वात धक्कादायक निकालाची नोंद झाली. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाचा 13 विरुद्ध 4 असा पराभव केला. 9 पैकी आठ जागांवर महेश शिंदे यांचे समर्थक निवडून आले, तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाचा एकच उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एकूणच जिल्ह्याचे विश्लेषण पाहता राष्ट्रवादीने बालेकिल्ल्यात सध्या जरी बाजी मारली असली तरी आत्मसन्मानाची लढाई करताना प्रतिष्ठेला तडे गेल्याचे जाणवले. भाजपने सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला चिवट झुंज दिली. शिवसेनेला पाटणमध्ये प्रतिष्ठा राखता आली नाही, पण कोरेगावात मात्र सेनेने बाजी मारली.
शशिकांत शिंदे यांना स्ट्रॅटेजी बदलावी लागणार
राष्ट्रवादीचे लढवय्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे विमान जिल्हा बँके नंतर पुन्हा एकदा कोरेगाव नगरपंचायतीच्या निकालाने जमिनीवर आणले आहे. आमदार महेश शिंदे यांनी सुसंघटितपणे प्रचार यंत्रणा राबवून कोरेगाव मध्ये महेश शिंदे यांचे नाणे चालते, हे दाखवून दिले. आमदार शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा जनतेत जाऊन काम करावे लागेल, असे चित्र आहे. गेल्या दहा वर्षाचा मिळवलेला जनाधार आणि विश्वासार्हता याचे राजकीय गणित कुठे चुकते आहे, हे त्यांना तपासावे लागेल.भाजपचा पुन्हा लढाऊ बाणा
खंडाळा, दहिवडी येथील नगरपंचायतीत भाजपने जागा कमी मिळवल्या असल्या तरी राष्ट्रवादीला दिलेली निकराची टक्कर चर्चेत राहिली. सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात भाजप सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. या निकालांनी सुद्धा भाजपने केलेला राजकीय संघर्ष चर्चेत राहिला असून जिल्ह्याच्या पूर्व भागात आमदार जयकुमार गोरे यांचे नाणे खणखणीत वाजले आहे. वडूज नगरपंचायतीत भाजपच सर्वाधिक मोठा गट ठरला. माण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवण्यात जयकुमार पुन्हा यशस्वी झाले. मात्र सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत त्यांना अपक्ष उमेदवारांना चुचकारावे लागणार आहे.


