शिक्षणातून काळाची आव्हाने पेलणारी पिढी निर्माण होते
प्रा. डॉ. यशवंत पाटणे; मुख्याध्यापक संजय क्षीरसागर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
सायळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय क्षीरसागर यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना असे अनेक माणिक मोती घडवण्याचे गौरवास्पद काम केल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.
सातारा : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि संधी देणारे शिक्षकच समाजातून माणिक मोती घडवीत असतात. शिक्षणातून काळाची आव्हाने पेलणारी पिढी निर्माण करण्याची सामर्थ्य या शाळेतील शिक्षकाकडे असते. सायळी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय क्षीरसागर यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना असे अनेक माणिक मोती घडवण्याचे गौरवास्पद काम केल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.
सायळी (ता. सातारा) येथील श्री घाटाईदेवी शिक्षण संस्थेतर्फे संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय मुरलीधर क्षीरसागर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सपत्निक सत्कार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी किसन विष्णुपंत देवरे यांचा देखील सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी श्री घाटाई देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ देवरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच कोल्हापूर विभाग शारीरीक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. जाधव, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेंचे संचालक सुरेश सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीरंग देवरुखे, राष्ट्रीय एकात्मकता विकास कार्य संघाचे अध्यक्ष भारत भोसले, पंचायत समिती सदस्या सौ. विद्याताई देवरे, प्रसिद्ध उद्योजक संतोष भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य यशवंत पाटणे पुढे बोलताना म्हणाले, समाजाचा विकास सत्तासंपत्तीपेक्षा ध्येयवादी शिक्षकांमुळे होत असतो. विद्यालय ही विद्यार्थ्यांची जागृत संस्कार मंदिरे असतात. देवाचे मंदिर आणि ज्ञानाचे मंदिर यांच्यातील अतूट नाते सांगणारे संजय क्षीरसागर हे शिक्षण दिंडीतील ज्ञानाचे वारकरी आहेत तर किसन देवरे हे मानवतेच्या दिंडीतील पाईक आहेत.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापक नानासो गुरव, यशवंत नेवासे, स्वप्नील साळुंखे, भारत भोसले, सौ. शुभांगी क्षीरसागर, विनोद मोरे तसेच सौ. प्रांजली मोटे यांनी मनोगते व्यक्त केली.
तानाजी अहिरे यांनी प्रास्ताविक केले. तर धनाजी खाड़े यानी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री घाटाईदेवी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र देवरे, सचिव मनोज देवरे, खजिनदार अजित जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


