सातारा : समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या परळी खोर्यातील सज्जनगडावर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ऐन
आषाढात पावसाने अगदीच दडी मारल्याने या टंचाईचा सामना करावा लागत आहे. गडावरील तळ्यातील पाण्याने तळं गाठल्याने अन्नछत्र सेवा प्रभावित होण्याची भीती आहे.
परळी खोर्यातील सज्जनगडावर वर्षभर समर्थ भक्तांची व पर्यटकांची ये-जा सुरू असते. मात्र यंदाचा पावसाळा सातारा जिल्ह्यासाठी सत्वपरीक्षा घेणारा ठरला आहे. आधी मृग कोरडे गेल्यानंतर धो धो बरसणार्या आषाढातही पाऊस नसल्याने सातारा जिल्ह्यातील बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. जिल्हयातील तीव्र पाणीटंचाईचा फटका ऐतिहासिक सज्जनगडाला बसला आहे येथील पाण्याची तळी पूर्णपणे आटली असून लगतच्या विहिरीची सुद्धा पाणी पातळी कमालीची घटली आहे. भर पावसाळ्यात पाऊस बेपत्ता झाल्याने भीषण पाणीटंचाईचा फटका येथील सेवकांना आणि गडावर येणार्या भक्तांना बसणार आहे. गडावर दोन स्वतंत्र सेवा मंडळे असून त्यांचे अन्नछत्र पाणी टंचाईमुळे प्रभावित होण्याची भीती आहे. सेवेकर्यांवर उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे.
सज्जनगडावर दहा वर्षापूर्वी अशीच टंचाईची परिस्थिती उदभवली होती. मात्र जुलै नंतर झालेल्या पावसाने सारी परिस्थिती सामान्य झाली. यंदा जून अखेरीस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दर्शविला आहे. सज्जनगडावर पाणी टंचाई आणखी तीव्र झाल्यास अनेक सेवांमध्ये खंड पडून सेवेकर्याची पंचायत होण्याची भीती आहे. गडावरील तळ्यांमध्ये जेमतेम आठ दिवस पाणी पुरेल इतकाच साठा आहे. तळ्यातील उपसा मोटारी व तळ्यात उतरणार्या दगडी पायर्या सुध्दा उघड्या पडल्या आहेत. येत्या आठ दिवसात पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचे संकट आणखी गडद होणार असून गडावर टँकर सुरू करावे लागतील, अशी परिस्थिती आहे.


