maharashtra

शहीद सुभेदार विजय शिंदे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

विसापूर येथे शोकाकूल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

last farewell to martyr Subhedar Vijay Shinde
लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर आज विसापूर ता. खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील नागरिक व आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पुसेगाव : लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिवावर आज विसापूर ता. खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील नागरिक व आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
२६ जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत शुक्रवारी (ता. २७) सकाळी ९ वाजताच्या सुमारास पडले.
या अपघातात विजय शिंदे यांच्यासह आणखी सहा जवानांना वीरमरण आल्याचे समजताच विसापूरसह तालुक्यात शोककळा पसरली होती. सुभेदार शिंदे यांचे पार्थिव लडाखमधून पुण्यापर्यंत सैन्यदलाच्या विमानाने आणण्यात आले.
आज सकाळी दहा वाजता पार्थिव विसापूरमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी दीड वाजता विजय शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसेच शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता.
सुरुवातीला पार्थिव घरी पोचताच विजय शिंदे यांच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यानंतर श्री वाघेश्वरी मंदिराशेजारील चावडी चौकात स्टेजवर सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव सर्वांकरता दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर विजय शिंदे यांची सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण गावातील रस्त्यांवर आकर्षक रांगोळी, पुष्पवृष्टी करण्यात आली. वीर जवान विजय शिंदे अमर रहे चे चौका-चौकात फ्लेक्स बोर्ड मोठ्या संख्येने लावण्यात आले होते.
विजय शिंदे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात विजय यांना अखेरचा निरोप देण्यात आला. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत, शासकीय इतमामात सुभेदार विजय शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
आज सकाळी दहा वाजता पार्थिव विसापूरमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी दीड वाजता विजय शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसेच शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता.

सातारा जिल्ह्याने "विजय शिंदे" सारखा एक वीर गमावला : पालकमंत्री
लेह लडाख येथे भारतमातेचे संरक्षण करीत असताना विसापूरचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे हे शहिद झाले.त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. शिंदे कुटुंबासोबतच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्या दुःखात संपूर्ण सातारा जिल्हा सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वाहिली.

विजय शिंदे यांचे कार्य अमर राहील : खा. श्रीनिवास पाटील
सातारा जिल्हा शूरवीरांचा व क्रांतिकारकांचा म्हणुन संपुर्ण देशभरात ओळखला जातो. देशसेवेची परंपरा जोपासण्याचे काम विसापूर गावातील अनेक युवक करीत आहेत. लेह लडाख येथे सुभेदार विजय शिंदे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले. देशाप्रती असणारे शहीद विजय शिंदे यांचे कार्य अमर राहील, अशी प्रतिक्रिया श्रद्धांजली वाहताना सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.