शाहू कला मंदिर ठेक्याने देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
प्रशासकीय सभेमध्ये तब्बल 182 विषयांना मंजुरी
सातारा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रशासकीय सेवेत शाहू कलामंदिर ठेक्याने चालवण्याच्या विषयाला हिरवा कंदील देण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या या सभेमध्ये 182 विषयांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय घंटागाडीचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यासाठी वार्षिक दर मंजूर करून तो विषय अंतिम करण्यात आला.
सातारा : सातारा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रशासकीय सेवेत शाहू कलामंदिर ठेक्याने चालवण्याच्या विषयाला हिरवा कंदील देण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या या सभेमध्ये 182 विषयांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय घंटागाडीचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यासाठी वार्षिक दर मंजूर करून तो विषय अंतिम करण्यात आला.
सातारा पालिकेची गेल्या सहा महिन्यातील चौथी प्रशासकीय सभा मंगळवारी सायंकाळी चार वाजता पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये सुरू झाली. पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. लेखापाल आरती नांगरे यांची सुद्धा उपस्थिती होती. सभेच्या इतिवृत्ताचे वाचन अतुल दिसले यांनी केले.
या सभेच्या अजेंड्यावर काही महत्त्वाचे विषय होते. घंटागाडीचा वार्षिक दर निश्चित करणे हा विषय महत्त्वाचा होता. घंटागाडीचा ठेका काळेवाडी पिंपरी येथील भगवते एंटरप्रायजेस यांना देण्याचे निश्चित झाले आहे. या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली. याशिवाय शाहू कला मंदिर ठेक्याने देण्यासाठी खुल्या निविदा मागवून यांच्या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी शाहू कला मंदिराचा खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ते ठेका पद्धतीने चालवण्या संदर्भामध्ये विषय चर्चेला आला. मुख्याधिकार्यांनी त्यामध्ये कोणत्या अटी-शर्ती असाव्यात यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले व स्थावर जिंदगी विभागाला त्या पद्धतीने अटी-शर्ती तयार करण्याच्या सूचना दिल्या.
सदर बाजार येथील माजी सैनिकांच्या पॉलिक्लिनिक सेंटरला सोळा लाखाचे एक्स-रे मशीन घेण्यासंदर्भातील विषयावर चर्चा झाली होती. मात्र हा विषय तांत्रिक कारणास्तव येऊ शकले नाही. हा विषय पुढील बैठकीत अजेंड्यावर घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण अभिजित बापट यांनी दिले. विषयपत्रिकेवरील 1 ते तेवीस विषय वार्षिक दर मंजूरीचे होते. त्यांना विनासायास मंजुरी मिळाली.
ठेका पद्धतीने चार अभियंते घेण्याच्या विषयावर सुद्धा चर्चा झाली. यामध्ये सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे मनुष्यबळ गरजेचे आहे. त्यामुळे चार विकसक घेणे गरजेचे असल्याचे मत टिपणी द्वारे नोंदवले गेले होते. त्यामुळे या विषयाला मंजुरी देणे आवश्यक होते. त्यानुसार या विषयावर चर्चा होऊन रार तत्वावर पुन्हा अभियंते घेण्याच्या विषयाला हिरवा कंदिल देण्यात आला.


