छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किंबहुना ज्यांच्या नावामुळे सातारा हे नाव पडले, त्या अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून मुस्लिम समाजातील बालगोपाळांनी खऱ्या अर्थाने सर्व धर्मीय समभावाचीच दिवाळी साजरी केली आहे.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किंबहुना ज्यांच्या नावामुळे सातारा हे नाव पडले, त्या अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून मुस्लिम समाजातील बालगोपाळांनी खऱ्या अर्थाने सर्व धर्मीय समभावाचीच दिवाळी साजरी केली आहे. वास्तविक पाहता बालचिमुकल्यांना दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. नवीन कपडे घालून फटाके उडविणे, गोडधोड फराळ करणे याच्या पलीकडेही जग आहे, याची जाणीव या निमित्ताने होत आहे.
सातारा जिल्ह्यातील मराठ्यांचा साम्राज्य असलेला अजिंक्यतारा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो. 1673 रोजी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे सुमारे दोन महिने राहिले होते. या किल्ल्याचा मोठा इतिहास असून या किल्ल्याच्या दरवाजाही शिल्पकार याचा नमुना आहे.
अजिंक्यतारा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी आहे. बारा वर्षाच्या रिहान जावेद बागवान व जहीर जावेद बागवान या दोन चिमुकल्यांनी चार दिवसाची मेहनत घेऊन हा मातीचा अजिंक्यतारा किल्ला तयार केला आहे. पाणी, माती, कागद, टायर, फॉर्म, पाईप नळी याचा चांगल्या पद्धतीने वापर करून या दोन चिमुकल्यांनी किल्ला तयार केलेला आहे. गेली वीस वर्षापासून हा किल्ला दिवाळीनिमित्त बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला अभिवादन केले जाते. यासाठी आजोबा सलीम बागवान यांची प्रेरणा मिळालेली आहे.
या किल्ल्यासोबतच शाहू स्टेडियम, सातारा बसस्थानक, राजपथ, मंगळाई देवी, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, जलमंदिर, राजपथ त्याचबरोबर किल्ल्यावर केलेली विद्युत रोषणाई नेत्रदीपक म्हणावी लागेल. त्यांना रिहाना बागवान व वसिम बागवान, सर्फराज बागवान यांची मोलाची साथ मिळाली आहे. या किल्ल्यामुळे खऱ्या अर्थाने या चिमुकल्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा माहित पडलेला आहे. रिहान जावेद बागवान हा शाहूपुरीतील अभिनव माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेत आहे. तर त्याचाच जुळा भाऊ जहीर बागवान हा कोरेगाव येथील दि मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. दोघांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


