पावसाच्या दडीने शेतकऱ्यांच्या लागल्या आभाळाकडे नजरा !
शेतीकामाचा खोळंबा, उकाडयामुळे नागरिकही त्रस्त
पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरु होवून नऊ दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप बुध परिसरात दमदार पाऊस पडला नाही. पावसाअभावी पेरणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
पुसेगाव : पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरु होवून नऊ दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप बुध परिसरात दमदार पाऊस पडला नाही. पावसाअभावी पेरणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
शेतीवरच शेतकरी अवलंबून असल्याने पेरणीकरीता पावसाची सुरुवात होणारे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रातच दरवर्षी पेरणी केल्या जातात. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पाऊस न पडल्यामुळे उन्हाळ्यात नांगरट केलेल्या रानातील ठेकळ फुटली नाहीत. पेरणीसाठी योग्य पाऊस पडला नाही. गेल्या आठवड्यापासून जाणवत असलेल्या उन्हाच्या तीव्र उष्ण झळामुळे शेतकर्यांच्या शेतीच्या कामाचा खोळबा होऊन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे वर्षभराच्या रोजीरोटीसाठी शेतात पेरणीकरिता शेतकर्यांना आणि उन्हाच्या उकाडापासून दिलासा मिळण्यासाठी सर्वाच्याच नजरा पावसाच्या आगमनासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.
पाऊस लांबणीवर गेल्यावर खरीप हंगामाच्या तयारीचा वेग मंदावणार आहे. या वर्षात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. असे असले तरी अद्याप शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने शेतकर्यांनी तडजोड करून कर्ज काढून पेरणीसाठी विविध प्रकारचे बी बीयाणे एकत्रित करून ठेवले आहे. वेळीच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केलेले आहे. त्याचे कर्जाचे डोंगर तर उभे राहणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. उन्हाच्या प्रचंड झळा लागत असल्याने शेतीकामासाठी हे उष्ण तापमान अडथळा ठरत आहे.


