maharashtra

शिरवळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुढील कारवाईसाठी दिले शिरवळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात

Absconding accused in Shirwal murder case arrested by local crime branch
शिरवळ येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सातारा : शिरवळ येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 मे 2022 रोजी 17.30 वा. चे सुमारास भादे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत दगडे वस्ती येथे उमेश पुरंदर काळे (वय 25, रा. दगडेवस्ती होडी भादे, ता. खंडाळा) याने उसने पैसे मागितल्याच्या कारणावरुन त्याचा गळ्यावर कुर्‍हाडीने वार करुन खून करण्यात आला होता. त्याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यानंतर पळुन गेले होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक तसेच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी या आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार हे आरोपीचा शोध घेत होते.
दि. 23 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्यातील आरोपी महेश मुकेश भोसले हा लोणंद येथे येणार असल्याची गोपनिय माहीती बातमीदारा मार्फत मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व त्यास पुढील कारवाईकामी शिरवळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देवून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या सुचनेप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पो.उपनि. अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, नितीन गोगावले, अमोल माने, गणेश कचरे, अमित सपकाळ, प्रविण कांबळे, मोहन पवार, प्रविण पवार, स्वप्निल दौड़, सचिन ससाणे यांनी केलेली आहे. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी अभिनंदन केले आहे.