maharashtra

सातारा शहरातील 48 कोटी रुपयांच्या विकासकामांचे मुख्याधिकाऱ्यांकडून कार्यादेश

तब्बल साडेपाचशे कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण; खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती

सातारा शहरांमध्ये तब्बल साडेपाचशे कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तब्बल 48 कोटी रुपयांच्या विकास कामांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे, अशी स्पष्ट माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सातारा : सातारा शहरांमध्ये तब्बल साडेपाचशे कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तब्बल 48 कोटी रुपयांच्या विकास कामांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे, अशी स्पष्ट माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या विकास कामांचा प्रस्ताव सन 2020 मध्ये सातारा विकास आघाडीने तयार करून नगर विकास विभागाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी आम्ही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची समक्ष भेट घेऊन या कामांची हद्दवाढीच्या कारणास्तव आग्रही मागणी केली होती. 48 कोटी रुपयांच्या या कामांमध्ये शाहूनगर, शाहूपुरी, खेड राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील काही भाग, महादरे, विलासपूर या भागांचे सर्वेक्षण करण्याचे निर्णय नगर अभियंता विभागाला देण्यात आले होते.
हद्दवाढ भागातील 41 किलोमीटरचे 411 रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भाग्योदय कॉलनी, तामजाई नगर, गणेश कॉलनी, कुंभारवाडा, महादरे, पीरवाडी, गोळीबार मैदान, रामराव पवार नगर, गोडोली, विलासपुर, शाहू नगर, आदर्श कॉलनी, लक्ष्मीनारायण नगर, गणेश कॉलनी, भैरोबा माळ, शाहूपुरी, खेड येथील कामांचा समावेश आहे. रामराव पवार नगर समाधीचा माळ, शाहूपुरी, शाहूनगर येथील १३ किलोमीटर लांबीची पावसाळी गटर्स तयार करण्यात येणार आहेत.
हद्दवाढ भागामध्ये एकूण 704 पथदिवे बसवले जाणार आहेत. रामराव पवार नगर, वाढे फाटा, रांगोळे कॉलनी, शिवराज कॉलनी येथील चार उद्यानांच्या विकसनाचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तब्बल 48 कोटी रुपयांचा विकास निधी या कामी खर्च होणार आहे. सातारा शहरात या निमित्ताने तब्बल साडेपाचशे कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. काही अदृश्य शक्ती या कामांसाठी निधी मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होत्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करून हा निधी प्राप्त करून घेत आम्ही जशास तसे उत्तर दिले आहे, असा टोला उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना लगावला आहे.
हद्दवाढ भागातील नागरिकांना सुविधा पुरवणे या एकमेव उद्देशाने ही कामे सुरू आहेत, याचे आम्हाला विशेष समाधान आहे. या संपूर्ण प्रक्रियेत हद्दवाढ भागातील स्थानिक नागरिकांनी अतुलनीय सहकार्य केले आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट, मुख्य नगर अभियंता दिलीप चिद्रे, सहाय्यक उपाभियंता तसेच पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कष्टाचे उदयनराजे यांनी मनापासून कौतुक केले आहे.