maharashtra

गोष्ट एका पायवाटेची...

मेढा तहसीलदार यांच्या आदेशाने मौजे म्हावशी येथे झाला अनाधिकृत रस्ता; जिल्हाधिकार्‍यांकडे चौकशीची मागणी

The story of a step road
भोसले यांनी स्वत:च्या मालकीच्या जागेतून गावासाठी पायवाट दिली. मात्र गावातील काहीजणांनी संगनमताने या पायवाटेचे रुपांतर दुसर्‍या जागेतून सव्वा आठ फुटी रस्त्यात केल्याची घटना म्हावशी, ता. जावली येथे घडलेली आहे. तहसिलदारांची दिशाभूल करुन हा रस्ता करण्यात आला असून याबाबतच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

सातारा : भोसले यांनी स्वत:च्या मालकीच्या जागेतून गावासाठी पायवाट दिली. मात्र गावातील काहीजणांनी संगनमताने या पायवाटेचे रुपांतर दुसर्‍या जागेतून सव्वा आठ फुटी रस्त्यात केल्याची घटना म्हावशी, ता. जावली येथे घडलेली आहे. तहसिलदारांची दिशाभूल करुन हा रस्ता करण्यात आला असून याबाबतच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
जावली तालुक्यातील मौजे म्हावशी येथे राहणारे प्रदीप भोसले यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या वाडवडिलांनी गावाच्या भल्यासाठी आपल्याकडील काही जमिनी गावासाठी विनामोबदला दिलेल्या आहेत. त्यांच्याच गट क्र 41/1 आणि 41/2 या जागांमधून नकाशामध्ये शासनाने एक तुटक रेषा दर्शवली होती. म्हणजेच ती पायवाट होती. ही पायवाट या दोन गटांमध्येच सिमित नव्हती. तर ती इतरही जागांमधून जात होती. त्याचा फायदा गावातील इतर ग्रामस्थांना होत होता. मात्र स्वत:च्या जमिनी वाचविण्यासाठी आणि आपली सोय पाहण्यासाठी नकाशावर असलेल्या पायवाटेच्या तुटक रेषेचा आधार घेऊन म्हावशी गावचे माजी सरपंच यशवंत आगुंडे, रकमाजी आगुंडे व नऊजणांनी रघुनाथ भोसले, श्रीरंग भोसले, पांडुरंग भोसले वविठ्ठल भोसले यांच्या विरोधात संगनमताने रस्ता अडवल्याची खोटी तक्रार तहसीलदार यांच्याकडे केलेली होती. याच तक्रारीवरून तहसीलदार मेढा (जावली) यांनी नकाशानुसार रस्ता न देता नियमबाह्य सव्वा आठ फुटी पाणंद रस्ता करून दिला आहे. हा रस्ता तयार करताना शेती कामासाठी पाणी पुरवठा करणारा पाण्याचा पाट, सुतार वस्ती चे सांडपाणी वाहून नेणारे गटार आणि काही झाडे तोडली आहेत. हे सर्व करत असताना माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप मानसिक त्रास दिला आहे. जर रस्ता करायचा होता तर नकाशावर तुटक रेषा गेली तिथुनच करायला पाहिजे होता तसे न करता दुसरीकडून केला परंतु तुटक रेषा ही संपूर्ण गावातून गेली असताना माझ्या एकट्याच्या गटातुन नाही गेली, यामुळे शासनाने नकाशातील ज्या-ज्या गटातुन तुटक रेषा गेली आहे, तिथुन शासकीय खर्चाने रस्ता करून द्यावा. तसे होत नसेल तर तहसीलदार मेढा जावली यांचा या रस्त्याचा आदेश रद्द करून चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला रस्त्याची चौकशी करण्याची मागणी प्रदिप भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री (ग्रामीण) यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.