maharashtra

एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान : मंगला गोडबोले


The great contribution of monthly culture in becoming a writer: Mangala Godbole
माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.

सातारा : माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
सातार्‍यातील शाहू कलामंदिरात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय तिसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार आणि जीवनगाैरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार स्वीकरल्यानंतर त्या बोलत होत्या.
यावेळी प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा जीनवगाैरव पुरस्कार नाशिक येथील वसंत खैरनार यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक
पारितोषिक वितरण देखील यावेळी झाले. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर आणि विनय हर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विनायक भोसले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, विनय हर्डीकर, वसंत खैरनार, मंगला गोडबोले, संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ लेखिका आणि पुरस्कार निवड समितीच्या सदस्या डॉ. अश्विनी धोंगडे आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगला गोडबोले म्हणाल्या की, जीव तोडून आणि मनापासून लिहिले की, गंभीर लेखन असले तरी वाचकांकडून त्या लेखनाचे स्वागत होते. विनोदी लेखन करणाऱ्यांचे गंभीर लेखन वाचले जात नाही, असा अनुभव माझ्या बाबतीत आलेला नाही. केवळ विनोदी लेखनच विकले जाते, हा गैरसमज आहे. माझ्या मते, जगात सर्वात अधिक चांगला समीक्षक हा 'काळ' असतो. समीक्षकांना उगाचच वाटते की, मी या लेखकाला मोठे केले, मी त्या लेखकाला मोठे केले. परंतू कोणी कोणाला मोठे करीत नसते. जे चांगले असते ते काळाच्या पटलावर टिकते, जे निरूपयोगी असते, ते मागे पडते. प्रत्येक पुस्तकाची अंतिम समीक्षा काळच
करीत असतो. लेखकाच्या प्रतिभेचे मोल प्रकाशक आणि वाचक ओळखतात आणि ते मोल ओळखून त्या प्रकारच्या लेखकाला ते जोपासतात. गुणी लेखक आहे आणि त्याच्याकडे लक्ष जात नाही, असे सहसा होत नाही.
वसंत खैरनार म्हणाले की, माझे वडिल प्राथमिक शिक्षक असल्याने आमचे पुस्तकांचे दुकान शिक्षकांचे पुस्तकांचे दुकान म्हणून ओळखले जात होते. मी या वाचन संस्कृतीच्या पालखीचा एक वारकरी आहे. आम्ही नाशिकमध्ये राबवित असलेल्या साहित्यिक उपक्रमांमुळे मला हा पुरस्कार मिळाल्याची मला जाणीव आहे. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर आदी मोठमोठ्या लेखकांच्या संपर्कात आल्याने ग्रंथव्यवहार हा आमच्या कुटुंबावर झालेला संस्कार आहे.
विनय हर्डीकर म्हणाले की, वाचन संस्कृती जोपासणारा वाचक हा लेखक-प्रकाशक यंत्रणेतला कणा आहे. लेखक-प्रकाशक-मुद्रक- मुखपृष्ठकार- वितरक आणि वाचक हा पिरॅमिड उलटा केला पाहिजे. त्यामध्ये सर्वप्रथम प्राधान्य वाचकाला दिले पाहिजे. वाचकांची आवड लक्षात घेऊन सुजाण वाचक घडविले पाहिजे. या प्रक्रीयेत वेळप्रसंगी वाचकांना धक्केही द्यावे लागण्याची आवश्यकता असू शकते. तसेच लेखक-प्रकाशक -वितरक अशा विविध वर्गवारीतून पुरस्कार देत असताना सुजाण वाचक पुरस्कार देखील दिला गेला पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजीव बर्वे यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. डॉ. अश्विनी धोंगडे यांनी पुरस्कार निवड समितीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.