maharashtra

विजयश्री सन्मान सोहळा उत्साहात

विजयश्री पुरस्काराचे वितरण : शिक्षित महिलांनी डोळसपणे जगावे : ताम्हणकर

Vijayshree honors ceremony in excitement
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देण्यात येणारा ‘विजयश्री पुरस्कार’ महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पुरस्कार प्राप्त महिलांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, साहित्य व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

कराड : विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देण्यात येणारा ‘विजयश्री पुरस्कार’ महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पुरस्कार प्राप्त महिलांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, साहित्य व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 200 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महिला दिनाचा जल्लोष साजरा केला.
येथील वेणूताई चव्हाण सभागृहात 10 मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विठामाता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका प्रतिभा ताम्हणकर होत्या. अध्यक्षास्थानी सांस्कृतिक विभाग अध्यक्ष मिनल ढापरे होत्या.
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कृषी विभागात काम करणाऱ्या नूतन मोहिते, कलाक्षेत्रात दया एकसंबेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे, क्रीडा क्षेत्रात प्रज्ञा वरेकर, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर, प्लंबिंग व्यवसायिक उज्वला मोटे यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विजयश्री पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी, ताम्हणकर म्हणाल्या, विजय दिवस समितीने विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. वैदिक, प्राचीन काळात स्त्रियांना महत्त्व होते. मात्र, परकीय आक्रमणामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे बंद होऊन त्यांचे शिक्षणही बंद झाले. त्यानंतर सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांनी स्त्रियांना घराबाहेर काढून त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणामुळे स्त्रियांची प्रगती झाली. आज महिलांना मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे गरजेचे आहे. शिक्षणाने सुसंस्कृत व्हावे, स्वातंत्र्य मिळावे. मात्र, दुसऱ्याचे स्वातंत्र्य जपणेही अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणामुळे घरे न तोडता घरे जोडली पाहिजेत. हे सर्व नव्या पिढीने जाणून घेणे गरजेचे आहे. सुसंस्कृतपणा हा भारताचा ठेवा आहे. देशाचा सुसंस्कृतपणा टिकवण्याची जबाबदारी महिला व मुलींवर आहे. शिकलेल्या महिलांनी डोळसपणे जगावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मीनल ढापरे म्हणाल्या, महिलांमध्ये गुणवत्ता असून त्यांनी ती भीती न बाळगता त्याचे सादरीकरण करणे गरजेचे आहे. स्वतःमधील न्यूनगंड बाजूला ठेवून काम करणे अपेक्षित आहे. कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय दिवस समारोह समितीचे काम उत्कृष्ट चालू असून समितीच्या वतीने महिलांना देण्यात येणारा पुरस्कार महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, दया एकसंबेकर, रेखा देशपांडे, प्रज्ञा वरेकर, डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर, उज्वला मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. स्मिता जोशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजहंस यांनी केले. प्राचार्य सतीश घाडगे यांनी आभार मानले. सहसचिव जाधव, प्राचार्य सतीश घाडगे, प्रा. बी.एस. खोत, प्रा. रमेश पवार, सतीश बेडके, मुंढेकर सर, अॅड. परवेज सुतार, वसीम शेख, स्नेहल राजहंस, आस्मा इनामदार, साधना राजमाने, स्मिता जोशी, सोनाली डवरी, सिद्धी ढापरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. कलाकार महिलांमुळे आयोजित केलेल्या संस्कृतीक कार्यक्रमात माहिलांनी विविध नृत्य, नाट्यछटा, गाणी यांचा आनंद लुटला.