जिल्ह्यात 36 लाखांनजिक नागरिकांनी घेतली लस
21 लाखांवर नागरिकांनी घेतला पहिला डोस : 14 लाखांवर नागरिकांनी घेतला दुसरा डोस
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 35 लाख 76 हजार 991 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
सातारा : डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 35 लाख 76 हजार 991 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
जिल्ह्यात एकूण 22 लाख 79 हजार 500 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 21 लाख 8 हजार 555 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 14 लाख 68 हजार 436 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याने लस घेणाऱ्या एकूण नागरिकांची संख्या 35 लाखा 76 हजार 991 एवढी दिलासादायक झालेली आहे.
यामध्ये 17 लाख 92 हजार 239 पुरुषांनी तर 17 लाख 84 हजार 123 महिलांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. 60 वर्षांवरील 7 लाख 74 हजार 914 नागरिकांनी लस घेतलीय तर 18 ते 44 वयोगटात 18 लाख 19 हजार 998 नागरिकांनी लस घेतलेली आहे. 45 ते 60 वयोगटातील 9 लाख 82 हजार 79 नागरिकांनी लस घेतलेली आहे.
95 टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस
जिल्ह्याला एकूण लसीकरणाचे उद्दिष्ट 22 लाख 79 हजार 500 एवढे असून आजमितीस त्यापैकी 21 लाख 8 हजार 555 नागरिकांनी लस घेतल्याने पहिल्या डोसचे लसीकरण 95 टक्के पूर्ण झालेले आहे. तर दुसऱ्या डोसचे लसीकरण 69 टक्के पूर्ण झाले असून 14 लाख 68 हजार 436नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण घेतलेले आहेत. अद्याप 9 लाख 58 हजार 235 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. मात्र, महिनाभरात 10 ते 15 हजारांच्या पटीत लसीकरणाचा वेग चांगला वाढला आहे.
32 लाखांवर नागरिकांना कोव्हिशिल्ड
जिल्ह्यात आरंभापासून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली असून एकूण लसीकरणात 32 लाख 36 हजार 538 नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतलेली आहे. तर 3 लाख 31 हजार 950 नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतलेली आहे. कोव्हॅक्सिनचा मध्यंतरी तुटवडा होता त्यामुळे कोव्हिशिल्स लस उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर कोव्हिशिल्ड लसीचा वापर करण्यात आला आहे.
23 लाख 35 हजार 187 नमुने तपासले
जिल्ह्यात गत दीड वर्षांच्या कालावधीत एकूण 23 लाख 12 हजार 297 जणांची कोरोना टेस्टिंग करण्यात आलेली आहे. यापैकी 2 लाख 52 हजार 290 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी 2 लाख 44 हजार 806 जण कोरोनामुक्त होवून बरे झाले आहेत. तर 6 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मृत्युदराचा आलेख खाली घसरला
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात यश आलेले आहे. कोरोनामुळे कोणाचा मृत्यु होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. त्यामुळेच कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. गेल्या वीस दिवसात एखादा मृत्यू झाला असून मृत्युदराचा आलेख खाली घसरलेला आहे. आतापर्यंत 6488 जणांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले 2 लाख 44 हजार 806 एवढे आहेत.


