बेलवडेतील अंगणवाडीच्या भिंती झाल्या बोलक्या
सरपंच डॉ. मोहिते यांची संकल्पना : चित्रलिपी कराडच्या चित्रकारांचे रंगकाम, सुशोभीकरणात भर
बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील अंगणवाडी व लगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर विविध संदेश व चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भिंत बोलकी झाली असून गावाच्या सुशोभीकरणातही भर पडली आहे.
कराड : बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील अंगणवाडी व लगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर विविध संदेश व चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भिंत बोलकी झाली असून गावाच्या सुशोभीकरणातही भर पडली आहे.
येथील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या अंगणवाडी व लगतच्या जागेला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. नुकतेच या भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्यावर सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांच्या संकल्पनेतून समाजातील महत्वपूर्ण प्रबोधनात्मक विषयांवर संदेश देणारे रंगकाम करण्याताले आहे.
बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून "माझे गाव माझे झाड" वृक्षारोपण, सूर्यनमस्कार, ग्राम स्वच्छता, मुलामुलींच्या शिक्षणाविषयी प्रोत्साहन व प्रबोधनात्मक संदेश, प्रदूषण, पर्यावरण आणि पाणी आदी. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य करणारे संदेश व चित्ररूपी संदेशही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे निर्जीव भिंतही बोलकी झाली आहे. तसेच यामुळे गावच्या सुशोभीकरणातही मोलाची भर पडली आहे.
या संरक्षक भिंतीवर कराड येथील चित्रलिपी'चे चित्रकार गणेश खवले यांनी आकर्षक रंगकाम करून मौलिक संदेश आणि चित्रे रेखाटली आहेत. तसेच यासाठी येणारा संपूर्ण खर्च गावातील इंजिनियर रोहित सुरेश मोहिते यांनी केला असून सरपंच डॉ. सुशांत मोहिते, तंटामुक्ती उपाध्यक्ष प्रवीण मोहिते, अविनाश मोहिते, सागर मोहिते, नितीन मोहिते, प्रकाश मोहिते, रुपेश मोहिते, ओंकार मोहिते, गणेश मोहिते, गणेश साळुंखे, सिकंदर मुल्ला, जाफर पटेल आदींचे सहकार्य लाभले.


