बिल्डर कडून आर्थिक तोड करणार्या महावितरणच्या सहा. अभियंत्यावर कारवाई करा!
सप्तर्षी प्राईड मधील रहिवाशांची जिल्हाधिकार्यांसह लाच लुचपत कडे मागणी
दुसर्या इमारतीच्या बिल्डरकडून आर्थिक तडजोड करुन सप्तर्षी प्राईड मधील रहिवाशांना नाहक मानसिक त्रास देणार्या महावितरणच्या सहा. अभियंत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सप्तर्षी प्राईड इमारतीमधील रहिवाशांनी सातारा जिल्हाधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांकडे केली आहे.
सातारा : करंजे येथील सप्तर्षी प्राईड या इमारतीच्या विद्युत रोहित्रावरुन बेकायदा कनेक्शन घेण्यासाठी दुसर्या इमारतीच्या बिल्डरकडून आर्थिक तडजोड करुन सप्तर्षी प्राईड मधील रहिवाशांना नाहक मानसिक त्रास देणार्या महावितरणच्या सहा. अभियंत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सप्तर्षी प्राईड इमारतीमधील रहिवाशांनी सातारा जिल्हाधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सुमारे दहा वर्षापूर्वी सप्तर्षी प्राईड या निवासी इमारतीचे बांधकाम सुरु झाले होते. त्यावेळी या इमारतीचे विकासक अर्थात बिल्डर अंकुश रामचंद्र जाधव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून इमारतीच्या मालकीच्या जागेमध्ये नवीन रोहित्र (डीपी) स्वखर्चाने बसवला होता. यासाठी सुमारे 17-18 लाख रुपये खर्च आला होता. हा सर्व खर्च त्यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देण्यात आला होता. दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. शाखा कार्यालय, करंजे, सातारा येथील सहा. अभियंता श्री. डोळे आपल्या कर्मचार्यांसह आणि ठेकेदारासह आमच्या बिल्डिंगमध्ये आले. त्यावेळी त्यांनी बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक लोखंडी पोल उभा केला. यावेळी रहिवाशांनी त्यांना याबाबत विचारले असता सप्तर्षी प्राइड लगत असणार्या दुसर्या बिल्डिंगला आम्ही कनेक्शन देत आहोत, असे त्यावेळी त्यांनी उत्तर दिले. यावेळी हा डीपी खासगी जागेत आहे, तसेच ज्यावेळी हा डीपी बसविण्यात आला त्यावेळी त्यासाठी लागणारा सर्व खर्च हा सप्तर्षी प्राईडचे विकासक श्री. जाधव यांनी महावितरण कंपनीला अदा केलेला आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या डीपीवरुन दुसर्या बिल्डिंगसाठी कनेक्शन देवू शकत नाही. हे नियमबाह्य आणि कायद्याला धरुन नाही, असेही सांगितले. मात्र असे असतानाही एका खासगी मिळकतीमध्ये अनाधिकाराने प्रवेश करुन व बिल्डिंगमधील रहिवाशांचा विरोध झुगारुन दांडगाईने सहा. अभियंता श्री. डोळे, कर्मचारी व ठेकेदाराने याठिकाणी लोखंडी पोल उभा केला. पोल उभा करुन ते निघुन गेले. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2023 रोजी सप्तर्षी प्राईड मधील सर्व रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रतापगंज पेठेतील कार्यालयात यासंदर्भात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच सप्तर्षी प्राईडमधील सर्व रहिवाशांनी दुसर्या बिल्डिंगला कनेक्शन देण्यासाठी विरोध केल्यानंतर सहा. अभियंता श्री. डोळे यांनी 1 मार्च 2023 रोजी पत्रक काढून सप्तर्षी प्राईडचे विकासक तसेच रहिवाशांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच तुम्ही जास्त मस्ती केली तर तुमचे लाईट कनेक्शन कट करुन टाकेन, असा दमही वायरमन च्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
सप्तर्षी प्राईड लगत असलेल्या दुसर्या इमारतीचे विकासक असलेले श्री. नवनाथ भोसले हे सुमारे 15 दिवसांपूर्वी सप्तर्षी प्राईड इमारतीत आले व त्यांनी इमारतीमधील रहिवाशांना सांगितले की, आमच्या कनेक्शनला विरोध करु नका, आम्ही अगोदरच तोट्यात आहे. करंजे येथील सहा. अभियंता श्री. डोळे यांना मी काही लाखांमध्ये रक्कम दिलेली आहे. तुम्ही जर विरोध केला तर दिलेले पैसेही बुडतील. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंतीही केली. सप्तर्षी प्राईडमधील रोहित्र (डीपी) हे खासगी जागेत आहे. तसेच यासाठी सप्तर्षी प्राईडचे विकासक श्री. जाधव यांनी लाखो रुपये खर्च करुन ते बसविलेले आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहा. अभियंता श्री. डोळे यांनी बिल्डिंगमधील रहिवाशांची तसेच विकासक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी परवानगी न घेता अनाधिकाराने, दंडेलशाहीने केवळ आर्थिक लोभापोटी आमच्या बिल्डिंगच्या खासगी परिसरात विद्युत पोल उभा केलेला आहे. सहा. अभियंता डोळे, त्यांचे इतर कर्मचारी हे शासकीय नोकरदार असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी त्यांनी लाचखोरी केलेली आहे.
त्यामुळे सहा. अभियंता डोळे यांच्यासह इतर कर्मचार्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सातारा आणि पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन देताना पत्रकार संग्राम निकाळजे, महेश निंबाळकर, रमेश जाधव, अविनाश कदम, सचिन पिसाळ, सत्यवान भोसले आदी उपस्थित होते.


