maharashtra

वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना अटक


Two suspects arrested for selling vehicles
ट्रक, टेम्पो व इतर मालवाहतुकीच्या वाहनांचे थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी करार करून घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.

सातारा : ट्रक, टेम्पो व इतर मालवाहतुकीच्या वाहनांचे थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी करार करून घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.
उन्मेष उल्हास शिर्के वय ४८, रा. वार्ड नंबर ३, नीरा, ता. पुरंदर,  जि. पुणे आणि अब्दुलकादिर मोहम्मद अली सय्यद वय ४९, रा. दर्वेशनगर, ता. पारनेर, जि. पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंडो स्टार कॅपिटल फायनान्स शाखा येथून सचिन बजरंग चव्हाण रा. एकंबे, ता. कोरेगाव यांनी एक दहा टायरचा एक ट्रक फायनान्सकडुन कर्जाने घेतला होता. या ट्रकचे हप्ते थकित राहिल्याने फायनान्स कंपनीच्या एजंटच्या ओळखीने संबंधित ट्रक हा उन्मेष उल्हास शिर्के याने थकीत हप्ते भरून, ठराविक रक्कम देऊन चालवण्यास घेतला होता. मात्र त्यानंतर ट्रकचे हप्ते थकीत राहू लागल्यामुळे ट्रक मालकाने संबंधिताला हप्ते भरण्यास सांगितले.
मात्र उन्मेश शिर्के हा ट्रकचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. दरम्यान हप्तेही भरत नाही आणि ट्रकही माघारी देत नाही, अशी दमदाटी तो सचिन चव्हाण यांना करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे  लक्षात येताच त्याने याबाबत उन्मेष उल्हास शिर्के याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने संबंधित संशयितांची माहिती प्राप्त करून त्यापैकी एकाला मुंबई व दुसऱ्याला पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे उन्मेष उल्हास शिर्के वय ४८, रा. वार्ड नंबर ३, नीरा, ता. पुरंदर,  जि. पुणे आणि अब्दुलकादिर मोहम्मद अली सय्यद वय ४९, रा. दर्वेशनगर, ता. पारनेर, जि. पुणे अशी असल्याचे सांगितले. चौकशी दरम्यान या दोघांनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, गुजरात अशा विविध भागातून अशाच प्रकारची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले. दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, कर्मचारी सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.