maharashtra

लक्ष्मीपूजनाची साताऱ्यात लगबग, पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी


दीपोत्सवातील एक महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. ही पूजा रविवार दिनांक 12 रोजी होत आहे. दरम्यान त्यासाठी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी खण आळी येथील परिसर, पोवई नाका ते देवी चौक मोती चौक तसेच सराफ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

सातारा : दीपोत्सवातील एक महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. ही पूजा रविवार दिनांक 12 रोजी होत आहे. दरम्यान त्यासाठी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी खण आळी येथील परिसर, पोवई नाका ते देवी चौक मोती चौक तसेच सराफ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गोल बागेच्या परिसरात पदपथावरच विक्रेत्यांनी आपली पथारी मांडली होती. छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळत असल्याने यंदाची दिवाळी सर्वांसाठी गोड होत आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीच्या रूपाने लक्ष्मीची पावले घरोघरी पडत असल्याचे दृश्य आहे. गेल्या काही दिवसापासून सातारकर खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत.
साताऱ्यात दिवसभर ढगाळ वातावरण व थंडगार हवा असतानाही  सातारकरांनी सायंकाळी मोती चौक गर्दीने व्यापून टाकला. सातारकरांच्या खरेदीमध्ये लक्ष्मी, लाह्या, बत्तासे, रंगीत कलर, रांगोळी, लक्ष्मीपट्टी स्टिकर तसेच लहान मुलांसाठी किल्ल्यांच्या खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळाली. व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजनानिमित्त कीर्द यांचे पूजन करण्यात येते. प्रथेप्रमाणे येथील व्यापाऱ्यांकडून या कीर्दला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. यंदा नागरिकांकडून उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात येत आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची लगबग सकाळपासूनच दिसून येत होती. सायंकाळी पाचनंतर ही गर्दी टप्प्याटप्प्याने वाढतच गेली. लक्ष्मीपूजनाचा रविवारचा मूर्त साधण्यासाठी सराफ बाजारांमध्ये सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसली. सोन्याचा भाव प्रति तोळा 62500 असतानाही सातारकरांनी सोने खरेदीमध्ये कोणतीही हयगय दाखवली नाही.
साताऱ्याच्या बाजारपेठेत लक्ष्मीजोडी दीडशे रुपये, पणत्या शंभर ते दीडशे रुपये, लाह्या बत्तासे पाकिट 20 रुपये, पाच नगांचे बोळके साठ रुपये, लक्ष्मीपट्टी 20 ते 40 रुपये, हळद-कुंकू पाकीट 20 रुपये या दराला उपलब्ध होत होते. रात्री साडेआठच्या नंतर पोलिसांची गर्दीवर नियंत्रण करताना प्रचंड कसरत झाली. रविवारी लक्ष्मीपूजन, त्यानंतर दिवाळी पाडवा, भाऊबीज तसेच शनिवार- रविवारच्या सुट्ट्या यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची खरोखर दिवाळी झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे दिवाळी साजरी केल्यानंतर फिरावयास बाहेर जाण्याचा सातारकरांचा जंगी बेत आहे.