maharashtra

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास शिक्षा


सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास न्यायालयाने कोर्ट उठे पर्यंतची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे.

सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास न्यायालयाने कोर्ट उठे पर्यंतची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 डिसेंबर 2015 रोजी महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनम माणिक पाटील या मारवाडी चौक ते देवी चौक जाणाऱ्या रस्त्यावर ड्युटी करीत असताना देवकुमार भगवान पाटील वय 28, राहणार सदाशिव पेठ, सातारा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच 11 बीडब्ल्यू 3220 ही नो एन्ट्रीतून नेऊन रस्त्याच्या मध्ये रहदारीस अडथळा होईल अशी उभी केली. म्हणून सोनम पाटील या संबंधित दुचाकी रस्त्याकडेला लावीत असताना देवकुमार पाटील याने सोनम पाटील यांचा हात पिरगळला तसेच धक्काबुक्की केली व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार ए. एस. ससाने यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते.
हा खटला चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून पुष्पा जाधव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपीस कोर्ट उठे पर्यंतची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास एक महिना साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार मीना गाढवे यांनी या केस कामी मदत केली.