maharashtra

खेड मंडलाधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची गरज

सरदार (सागर) भोगावकर यांची मागणी : 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा

खेड मंडलाधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला जिल्हा प्रशासनाने चाप लावण्याची गरज निर्माण झाली असून या भ्रष्ट अधिकार्‍याला पदमुक्त करुन तेथे एखाद्या प्रामाणिक अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सातारा : खेड मंडलाधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला जिल्हा प्रशासनाने चाप लावण्याची गरज निर्माण झाली असून या भ्रष्ट अधिकार्‍याला पदमुक्त करुन तेथे एखाद्या प्रामाणिक अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच माझ्या मागणीची पूर्तता न झाल्यास 26 जानेवारी 2023 रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेड सर्कलचे मंडलाधिकारी अजित घाडगे हे तेथे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून या कालावधीत त्यांनी सर्वसामान्यांना नाडत भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब करीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आर्थिक शोषण केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये संतापाच्या तीव्र भावना आहेत. प्रत्येकाकडून चिरीमिरी गोळा केल्याशिवाय या महाशयांचे पेन चालतच नाही. जर एखाद्याने लाच देण्यास नकार दिला तर हे त्याचे काम या ना त्या कारणाने अडवून ठेवतात. संबंधिताच्या कागदपत्रांमधील पाने गायब करणे व तिच तिच कागदपत्रे पुन्हा-पुन्हा मागणे, यामुळे काम अडल्याचे संबंधितास सांगण्याचा पायंडाच जणू यांनी पाडला आहे. तसेच वारस नोंदी, खुषखरेदीपत्राच्या नोंदी या आर्थिक तडजोड झाल्याशिवाय त्याचा फेरफार न धरणे अथवा फेरफार झाला असल्यास तो अनाधिकाराने रद्द करणे, अशी छछोरगिरी या महाशयांकडून होत आहे. एकंदरीत दाम तर काम, या उक्तीवरच ते ठाम असतात. काम करुन घ्यायचे असल्यास शेवटी संबंधितास यांचे हात ओले करण्याशिवाय पर्यायच राहत नाही.
तहसिलदार तसेच उपविभागीय अधिकार्‍यांचे नाव सांगून नाडलेल्याकडून लाच स्विकारणे, अशा गंभीर स्वरुपाचा गुन्हा या अजित घाडगे नामक मंडलाधिकार्‍याकडून घडत आहे. मात्र गरजवंताला अक्कल नसते प्रमाणे कोणीही त्याच्याविरोधात ब्र उच्चारायला धजावत नाही. यापूर्वी हा घाडगे शिरवळ येथे कार्यरत असताना लाचलुपतच्या शिकंज्यात सापडलाही होता. मात्र, त्यातून बोध न घेता याचे भ्रष्ट कामकाज सुरुच आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी करुन भ्रष्ट अजित घाडगे याला पदमुक्त करावे आणि तेथे प्रामाणिक अधिकार्‍याची नियुक्ती करावी. जेणेकरुन नागरिकांचे कामे अव्याहतपणे आणि लाचेविना होतील. या मागणीचा जर विचार झाला नाही तर दि. 26 जानेवारी 2023 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनात भोगावकर यांनी दिला आहे.