maharashtra

बिबट्याच्या हल्ल्यातून वडिलांनीच वाचवले लहान मुलाचे प्राण

किरपे येथील घटना : जखमी मुलावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू, वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या हालचाली

The father saved the child's life from the leopard attack
किरपे, ता. कराड येथे बिबट्याने 5 वर्षाच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवार 20 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु,  मुलाच्या वडिलांनीच प्रसंगावधान दाखवून बिबट्याचा प्रतिकार करत मुलाचे प्राण वाचवले आहेत.

कराड : किरपे, ता. कराड येथे बिबट्याने 5 वर्षाच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवार 20 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु,  मुलाच्या वडिलांनीच प्रसंगावधान दाखवून बिबट्याचा प्रतिकार करत मुलाचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच किरपे येथे बिबट्याने ऊसतोड मुजराच्या मुलाचा प्राण घेतला होता. तसाच हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, किरपे येथील शेतकरी धनंजय देवकर व त्यांचा मुलगा राज देवकर हे गुरुवारी सायंकाळी  त्यांच्या शेतात काम करत होते.  सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धनंजय देवकर हे शेतीचे काम उरकून घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, त्यांनी शेती अवजारांची आवराआवर सुरू केली. साहित्य (कैची) पिशवीत भरून ठेवताना त्यांचा लहान मुलगा राज धनंजय देवकर (वय ५) हा त्यांना मदत करत होता. तो खाली वाकून अवजार उचलून देत असताना बाजूच्या शेतातून बिबट्याने अचानक राज देवकर याच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून ओढून त्याला शेतात नेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राजचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगवधान दाखवत अतिशय धैर्याने आपल्या मुलाचे पाय पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले. तसेेच मदतीसाठी त्यांनी आरडा-ओरडाही केला. या झटापटीत शेतालगत असलेल्या तारेचे कुपनाला बिबट्या धडकल्याने त्याला मुलाला उसाच्या शेतात ओढून न्हेता आले नाही. त्यामुळे बिबट्या त्या मुलाला तेथेच सोडले. ही संधी पाहून तात्काळ धनंजय देवकर यांनी त्यांच्या मुलाला उचलून घेतले. त्यानंतर बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.  
सुदैवाने या घटनेत लहान मुलगा राज देवकर याचे प्राण वाचवण्यात त्याचे वडील धनंजय देवकर यांना यश आले. परंतु, या हल्ल्यात राज देवकर याच्या मानेला व कानाला बिबट्याचे दोन दात जोरात लागले आहेत. तसेच त्याच्या पाठीवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यानंतर धनंजय देवकर व ग्रामस्थांनी त्याला तात्काळ उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच तात्काळ सहायक वनसंरक्षक महेश झांझुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, तसेच किरपे येथील पोलीस पाटील यांनी रुग्णालयात उपस्थित राहुन जखमी राज देवकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर त्यांनी बिबट्याच्या या हल्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. त्यानुसार वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.