maharashtra

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं निधन

साताऱ्यात आज होणार अंत्यसंस्कार; सातारकरांवर शोककळा

साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं होतं.

सातारा : साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं होतं. सातारा जिल्ह्यात ज्यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले त्यावेळी राजघराण्यातील वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळं सातारा राजघराणे आणि सातारकरांवर शोककळा पसरली आहे.
उदयनराजे भोसले यांचे चुलते श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन झालं आहे. पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल सायंकाळी ५.४५ वाजता प्राणज्योत मालवली. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणले गेले. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी अनेक वेळा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन केले होते.
साताऱ्याच्या राजघराण्यातील पुण्यशील सुमित्राराजे भोसले आणि शाहू महाराज यांना प्रतापसिंह, अभयसिंह, विजयसिंह आणि शिवाजीराजे अशी चार मुलं. शिवाजीराजे भोसले हे सर्वात लहान होते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला होता. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचे नगराध्यक्ष म्हणून 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत काम केलं. याकाळात त्यांनी सातारा शहराच्या विकासासाठी विविध विकासकामं केली.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना खेळाची आवड होती. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही त्यांनी काम केलं. सातारा शहरातील आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवतेज माध्यमिक विद्यालय, आरे या संस्थेच्या उल्लेखनीय कार्यात त्यांचं मार्गदर्शन नेहमी असायचं.
अदालत वाडा आणि श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याविषयी सातारकरांमध्ये नेहमी आदराची भावना राहिली आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे गेली ७५ वर्ष साताऱ्यातील आदालत वाडा येथे राहत होते. आदालत वाडा हा न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता व आज देखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक मानतात.
सातारा शहराच्या राजकारणात विविध निवडणुकांच्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं किंवा उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेल्यास वेळोवेळी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी वडिलकीच्या नात्यानं दोघांमधील मतभेद मिटवून मनोमिलन घडवून आणलं होतं.
श्री. छ. शिवाजीराजे भोसले महाराज यांची अंत्ययात्रा आज दुपारी 1 वाजता अदालत राजवाडा ते समर्थमंदिर ते राजवाडा ते राजपथ ते नगरपरिषद ते पोवई नाका अशी निघणार आहे.