सातारचे थिएटर वर्कशॉप श्री.छ.सौ. चंद्रलेखाराजे भोसले करंडकचे मानकरी
राज्यस्तरीय हास्यतारा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री.छ.सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री.छ.प्रतापसिंह महाराज सेवाधाम आणि सातारा रंगकर्मी यांच्यावतीने हास्यतारा या राज्यस्तरीय लघुनाटिका (स्कीट) स्पर्धेचे आयोजन शाहूकलामंदिर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत 21 संघांनी सहभाग घेतला.
सातारा : श्री.छ.सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री.छ.प्रतापसिंह महाराज सेवाधाम आणि सातारा रंगकर्मी यांच्यावतीने हास्यतारा या राज्यस्तरीय लघुनाटिका (स्कीट) स्पर्धेचे आयोजन शाहूकलामंदिर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत 21 संघांनी सहभाग घेतला. त्यांनी वेगवेगळया विषयांवर दर्जेदार, मनोरंजनपर स्कीट सादर केल्याने सातारकरांनी त्याला भरभरुन दाद दिली. या स्पर्धेत सातारचे थिएटर वर्कशॉप हे श्री.छ.सौ. चंद्रलेखाराजे भोसले करंडकचे मानकरी ठरले.
स्पर्धेचा ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.छ. शिवाजीराजे भोसले, श्री.छ. प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी श्री.छ.वृषालीराजे भोसले यांनी स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू सांगितला. त्याचप्रमाणे यापुढेही विविध उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली. स्पर्धेत पुणे, मुंबई,कल्याण, पनवेल, सांगली, कोल्हापूर, वाई, कराड आणि सातारा येथील 21 संघांनी भाग घेतला. यामधून सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक सेकंड इनिंग (थिएटर वर्कशॉप, सातारा), व्दितीय क्रमांक – बेत (आर्टिस्टिक राइट्स, पुणे), तृतीय क्रमांक - मला हिरो व्हायचंय (सतरंगी सातारकर, सातारा) यांनी मिळवले. वैयक्तिक पारितोषिकामध्ये उत्कृष्ट अभिनेता - वनराज कुमकर (सेकंड इनिंग), उत्कृष्ट अभिनेत्री - सुजाता चव्हाण (सेकंड इनिंग), उत्कृष्ट लेखक डॉ. मिलिंद सुर्वे (सेकंड इनिंग), उत्कृष्ट दिगदर्शक सुहास चव्हाण (हिजडे है हम) यांनी मिळवले. स्पर्धेसाठी निलेश महिगावकर आणि सिध्देश्वर झाडबुके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री.छ.प्रतापसिंह महाराज सेवाधामचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा रंगकर्मी, शाहुनगरी फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले तसेच सातारा रंगकर्मीचे विशेष सहकार्य मिळाले. स्पर्धा पाहण्यासाठी साता-यातील रसिक श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.


