maharashtra

लोणंदमधील प्राजक्ता घोडकेचा बुलेट रायडिंगचा विक्रम

17 तासांत 480 किलोमीटरचा प्रवास करत घेतले अष्टविनायकांचे दर्शन

तब्बल 480 किलोमीटर दुचाकीवरुन अवघ्या सतरा तासांत प्रवास करुन अष्टविनायक दर्शन घेण्याचा विक्रम लोणंदमधील प्राजक्ता घोडके हिने केला आहे. या दरम्यान तिने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा संदेश देत मुलींपुढे आदर्श प्रस्थापित केला असून अशा प्रकारे बुलेट रायडिंग करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली असून तिच्या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने घेतली आहे.

बुलेट रायडिंग करणारी ठरली महाराष्ट्रातील पहिली मुलगी
लोणंद : तब्बल 480 किलोमीटर दुचाकीवरुन अवघ्या सतरा तासांत प्रवास करुन अष्टविनायक दर्शन घेण्याचा विक्रम लोणंदमधील प्राजक्ता घोडके हिने केला आहे. या दरम्यान तिने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा संदेश देत मुलींपुढे आदर्श प्रस्थापित केला असून अशा प्रकारे बुलेट रायडिंग करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली असून तिच्या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने घेतली आहे.
प्राजक्ताने या मोहिमेस शुक्रवारी पहाटे साडेपाचला मोरगावपासून सुरूवात केली. तेथून पुढे सिध्दटेक, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री आणि अष्टविनायकातील शेवटचा गणपती पाली येथे रात्री साडेनऊ वाजता पोहोचून पूर्ण केला. यासाठी सतरा तास 480 किलोमीटरचा अखंड प्रवास एकटीने पूर्ण केला. याची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद घेणार आहे. या मोहिमेसाठी प्राजक्ताला एव्हरेस्टवीर प्रजित परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.  या मोहिमेदरम्यान प्राजक्ताने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश देत ही अनोखी रायडिंग पार केली.
रायडिंग पूर्ण केल्यानंतर तिचे लोणंद नगरीत आगमन झाल्यावर अहिल्यादेवी स्मारक परिसरात तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांनी तिला शाल-श्रीफळ देऊन तिचा सत्कार केला. नगरसेविका दीपाली शेळके, ज्योती डोणीकर, राजश्री शेळके, स्मिता काळे, अनुराधा कुलकर्णी, डॉ. अनिलराजे निंबाळकर, प्राजित परदेशी, सागर गालिंदे, आशितोष घोडके उपस्थित होते. मोहिमेबाबत लोणंद येथील राजमाता अहिल्या देवी स्मारकाच्या समोर सायंकाळी साडेपाचला फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार करण्यात आला.
प्राजक्ताचे वडील बँकेत सेवक पदावर कार्यरत असून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुला-मुलीला उच्च शिक्षण दिले.  प्राजक्ता सध्या बेंगलोर येथे आयटी कंपनीत नोकरी करते. यापूर्वीही तिने ग्रुपमध्ये सहाशे किलोमीटरचा दुचाकीवरुन प्रवास केला आहे. लोणंदसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहीलेली प्राजक्ता नोकरी करत अशा प्रकारच्या धाडसी मोहिमा यशस्वी करुन सामाजिक संदेश देत आहे.

रायडिंग पूर्ण झाल्यानंतर खूप आनंद झाला : प्राजक्ता घोडके
लोणंदमध्ये तिचे नागरिकांनी अभिनंदन केल्यावर या मोहिमेविषयी सांगताना प्राजक्ता घोडके हिने ही रायडिंग पूर्ण केल्यानंतर मोठा आनंद झाला. कारण ही बुलेट रायडिंग करताना सर्व प्रकारची काळजी घेत प्रवास करावा लागत होता. प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाताना सुरक्षेसाठी घातलेले हेल्मेट व इतर साहित्य काढून ठेवावे लागत होते. त्यात वेळ जात होता. मात्र, प्रत्येक ठिकाणी तेथील कार्यकर्त्यांकडून चांगले सहकार्य झाले. सायंकाळी महाडच्या दिशेने आगेकूच केली. तो 100 कि. मी. चा रात्रीचा प्रवास थरारक होता. शेवटी 9.30 वाजता पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथून जो अभिनंदनाचा वर्षाव झाला त्यामुळे खूप आनंद होत आहे. मुली देखील कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात, त्यांना संधी दिली तर मुली प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करुन दाखवतात हे मला सिध्द करता आले.