राज्यमंत्र्यांना दुर्दैवाने आपले अधिकार वाढवून मिळाले नाहीत
शंभूराज देसाई यांनी बंडखोरी नंतर प्रथमच व्यक्त केली खंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अनेक पदे दिली. मात्र त्या पदांचे जे वाढीव अधिकार होते ते आम्हाला दुर्दैवाने मिळाले नाहीत. त्यामुळे सभेचे कामकाज चालवणे आणि विकास कामांच्या प्रस्तावाची शिफारस करणे इतकेच नामधारी काम आमच्या हातात उरले होते, अशी खंत बंडखोर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट गुवाहाटी येथून व्यक्त केली.
सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अनेक पदे दिली. मात्र त्या पदांचे जे वाढीव अधिकार होते ते आम्हाला दुर्दैवाने मिळाले नाहीत. त्यामुळे सभेचे कामकाज चालवणे आणि विकास कामांच्या प्रस्तावाची शिफारस करणे इतकेच नामधारी काम आमच्या हातात उरले होते, अशी खंत बंडखोर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट गुवाहाटी येथून व्यक्त केली.
शंभूराज देसाई यांनी बंडखोरी केल्यानंतर प्रथमच आपला एक व्हिडिओ जाहीर केला आहे. नुकतेच शंभूराज देसाई यांनी आपल्या साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध घडवून आणली. तसेच मरळी येथील देसाई समर्थकांनी मेळावा घेऊन त्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी एक व्हिडियो जाहीर करत मंत्रीमंडळाच्या कामात आपल्याला कशा अडचणी येत होत्या, याची व्यथा आज जाहीरपणे बोलून दाखवली.
ते पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने विविध कामांचे प्रस्ताव तसेच अधिकार वृद्धी याचा वारंवार पाठपुरावा केला होता. माझ्याकडे वित्त, पणन, गृह ग्रामीण अशी खाती होती. या खात्यांमध्ये मला केवळ शिफारस करण्याचे काम होते. मतदारसंघामध्ये फिरताना आमच्याकडे वेगवेगळ्या विकासकामांचे असंख्य प्रस्ताव येत होते. लोकांना आमच्या भेटीमध्ये विकासकामांचे प्रस्ताव दिले म्हणजे आपले काम झाले असे वाटत होते. मात्र हा गैरसमज मला दूर करावयाचा आहे. या विकास कामांच्या प्रस्तावांची नीट छाननी करून त्याचा उपयुक्त सारांश तयार करून त्यांची शिफारस कॅबिनेट खात्याकडे करणे तसेच विधानसभा कालावधीमध्ये प्रश्नोत्तरांच्या तासाला त्या-त्या खात्याच्या वतीने उत्तरे देणे इतकेच काय ते काम आमच्या हातामध्ये होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात आम्ही वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला आणि ज्या-ज्या वेळी भेट झाली त्यावेळी आम्ही राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात यावी, असे आम्ही आग्रहाने सांगितले होते. अगदी पणन महामंडळाच्या सचिव आणि अध्यक्षपदाच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात यावी, हा मुद्दाही मी आग्रहाने मांडला होता. मात्र दुर्दैवाने याचा विचार झाला नाही. राज्यकारभारातील या बाजू मला जाहीररित्या जनतेसमोर मांडताना अतिशय वेदना होत आहेत. मात्र जे घडले ते सांगायलाच हवं म्हणून हा शब्दप्रपंच केल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.


