दोन महिन्यांपासुन हरवलेल्या पित्याशी पुत्राची झाली भेट
१०८ रुग्णवाहिका चालकांचा पुढाकार ; वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही गहिवरले
दोन महिन्यांपासुन हरवलेल्या पित्याशी पुत्राची भेट घडवून आणण्यात १०८ रुग्णवाहिका चालकांना यश आले. मनोज पवार, रा. डी. पी. भोसले कॉलेज पाठीमागे, कोरेगाव, ता. कोरेगाव आणि अमोल चव्हाण, रा. महागाव, ता. सातारा अशी रुग्ण वाहिकाचालकांची नावे आहेत.
सातारा : दोन महिन्यांपासुन हरवलेल्या पित्याशी पुत्राची भेट घडवून आणण्यात १०८ रुग्णवाहिका चालकांना यश आले. मनोज पवार, रा. डी. पी. भोसले कॉलेज पाठीमागे, कोरेगाव, ता. कोरेगाव आणि अमोल चव्हाण, रा. महागाव, ता. सातारा अशी रुग्ण वाहिकाचालकांची नावे आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना आपल्या पित्याला शोधण्यासाठी पुत्राने केलेली धडपड पाहून येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही या भेटीमुळे क्षणभर गहिवरून गेले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बरजुन मांजी, मुळ रा. बिहार, सध्या रा. आनेवाडी टोल नाका परिसर, ता. सातारा हे आपल्या छोट्या कुटुंबीयांसमवेत आनेवाडी टोल नाका परिसरात वास्तव्य करतात. त्यांचा छोट्या टपरीचा व्यवसाय आहे. तो व्यवसाय त्यांचा मुलगा पाहतो. दोन महिन्यापुर्वी अचानक बरजुन मांजी आनेवाडी टोल नाका परिसरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच ते देगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत असणार्या एका ओढ्यात लगत बेवारस स्थितीत आढळून आले होते. एक अनोळखी इसम बेवारस स्थितीत पडलेला असल्याची माहिती देगाव येथील पोलीस पाटलांनी १०८ रुग्णवाहिका सेवेला कळवली.
ही माहिती मिळताच मनोज पवार आणि अमोल चव्हाण हे दोन चालक तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी त्या बेवारस इसमाला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याने त्यांची रवानगी वार्ड क्रमांक ९ मध्ये करण्यात आले. त्या बेवारस इसमाला रुग्णालयात दाखल करतेवेळी स्वतःचे नाव, गाव, पत्ता सांगता येत नसल्यामुळे अनोळखी इसम म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, आपला पिता अचानक बेपत्ता झाल्याने हैराण झालेल्या त्याच्या पुत्राने याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात माहिती कळवत पिता हरवल्याचे पोस्टर सातारा शहर परिसरासह येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावली. त्या पोस्टर्सवर संबंधीत इसमाचे नाव, पत्ता, वर्णन आणि छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान सोमवार दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात १०८ रुग्णवाहिका चालक मनोज पवार आणि अमोल चव्हाण हे आपले कर्तव्य बजावत होते. सायंकाळी सात वाजता चहा पिण्यासाठी ते रुग्णालयाच्या प्रवेशद्वातुन बाहेर पडत असताना त्यांना ते पोस्टर निदर्शनास आले. पोस्टरवरील फोटो ओळखीचा वाटल्यामुळे संबंधित इसम हा जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ९ मध्ये उपचार घेत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वार्डकडे धाव घेत त्या इसमाच्या प्रकृतीची चौकशी केली असता तो इसम बरजुन मांजी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते आता ठीक आहेत मात्र जोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयाशी संपर्क साधत नाहीत तोपर्यंत त्यांना रुग्णालयातून सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
मनोज पवार आणि अमोल चव्हाण यांनी तात्काळ पोस्टर्सवरील दुरध्वनीवर संपर्क साधुन जिल्हा रुग्णालयात येण्याची सूचना केली. साधारण तीस मिनिटांमध्येच बरजुन मांजी यांचे कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आपले पिता ठीक आणि सुरक्षित आहेत, हे पाहताच बरजुन मांजी यांच्या पुत्राने त्यांना कडकडून मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पिता-पुत्रांनी रुग्णवाहिका चालकांना अनेक धन्यवाद देत त्यांच्याबरोबर एक छायाचित्र काढण्याचा हट्ट धरला. हा संपूर्ण भावनिक सोहळा पाहून जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी अत्यंत भावुक झाले. स्वतःच्या वृद्ध पित्याला न संभाळणारे अनेक पुत्र पाहिले, पित्याला वृद्धाश्रमात ठेवून स्वतः बंगल्यात राहणारे अनेक पुत्र पाहिले. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही आपल्या पित्याला शोधण्यासाठी विविध प्रयत्न करणाऱ्या पुत्रासह पिता-पुत्राची भेट घडवून आणणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना यावेळी अनेकांनी सलाम ठोकला.


