maharashtra

जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांची निदर्शने


Demonstration of Asha Sevikas in front of Zilla Parishad
जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी निदर्शने केली.

सातारा : जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी निदर्शने केली.
आशा सेविकांना महिन्याला १८ तर गट प्रवर्तकांना २२ हजार रुपये वेतन देण्यात यावे, कोरोनातील थकित जोखीम भत्ता मिळावा तसेच इतर मागण्यांसाठी आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदसमोर निदर्शने केली. यावेळी मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली. सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
 त्यामध्ये म्हटले आहे की, २0१९ पासून आशा व गटप्रवर्तकांच्या राज्य आणि केंद्र शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत. कोरोनासाठीचा एक हजाराचा जोखीम भत्ता थकित आहे. तो देण्यात यावा, हा भत्ता पुन्हा सुरु करावा, पन्नास हजारांचे विमा कवच लागू करावे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायम सुरु करावे, ईएसआय, पीएफ आणि महिना १० हजार रुपयांची पेन्शन योजना लागू करावी, महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन मिळावे, सार्वजनिक सेवांचे खासगीकरण करु नये आणि आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करावे, अशा आमच्या मागण्या आहेत.
संघटनेचे तज्ञ सल्लागार कॉ. माणिक अवघडे, अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पल्लवी नलावडे, पुष्पा मसणे, सीमा भोसले, शकुंतला नाळे, जयश्री काळभोर, सुजाता ननावरे, अश्विनी शिंदे आदी सहभागी झाले होते.